Join us

दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:38 AM

पालिका मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशात मग्न.

मुंबई : दिवाळी संपेपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका, असे आदेश मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीपूर्वी महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र दिवाळी संपून दीड महिना झाला तरीही फेरीवाल्यांना हटवण्याचे काम महापालिकेने सुरू केले नाही.

सध्या दादरच नाही तर बोरिवली, मालाड, कुर्ला, माटुंगा, घाटकोपर आदी भागातही फेरीवाले फुटपाथ आणि रस्ते साेडायला तयार नाहीत. मतांचे राजकारण जरूर करा मात्र आम्हाला चालण्यासाठी माेकळे रस्ते ठेवणार की नाही असा संतप्त सवाल मुंबईकर करत आहेत. 

फेरीवाल्यांना अधिकारी कधी हटवतील आणि त्यांचा चक्रव्यूव्ह भेदायचा तरी कसा? असा प्रश्न राेज घराबाहेर पडणाऱ्यांपुढे आहे. दिवाळीत पालिकेने दादर मधील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली होती. मात्र या फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींनी केसरकर यांची भेट घेऊन दिवाळी संपेपर्यंत कारवाई करू नका, अशी विनंती केली होती. सणासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर माल आणला आहे, कारवाई झाली तर आमचे नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे होते. सण संपेपर्यंत  त्यांच्यावर कारवाई करू नका, असे केसरकर यांनी सांगितले होते. मात्र दिवाळी झाल्यानंतर कारवाई पुन्हा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु फेरीवाल्यांचा तळ कायम आहे.

नियमाचा विसर:

रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरात व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना मनाई केली आहे.

सीएसएमटी भुयारी मार्ग फेरीवाल्यांच्या ताब्यात:

येथील भुयारी मार्ग तर फेरीवाल्यांनी जणू ताब्यातच घेतला आहे. अगदी स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून त्यांनी बस्तान बसवले आहे.  भुयारी मार्गाच्या आतील भागातील दुकानांबाहेरील मोकळ्या जागाही  फेरीवाल्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.

घाटकोपरवासीयांचा मोर्चाचा इशारा:

 फेरीवाले हटवण्यासाठी ‘आम्ही घाटकोपर’ संघटनेने स्थानिक पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. फेरीवाले न हटवल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेला  श्रद्धानंद रोड, हिराचंद देसाई मार्ग, खोत लेन, एमजी रोड या ठिकाणी  फेरीवाल्यांचा मुजोरपणा सहन करावा लागत आहे. 

 हे मार्ग फेरीवाला मुक्त करण्यासाठी मध्यंतरी निवेदन देण्यात आले होते. तरीही फेरीवाले कायम आहेत. फेरीवाल्यांनी  चालण्यास पदपथ आणि रस्तेही मोकळे सोडलेले नाहीत. या परिसरात सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकादीपक केसरकर