ऑगस्ट महिन्यात साडे 15 लाख लोकांचा रोजगार गेला; राष्ट्रवादीने CMIE चा अहवाल दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:53 PM2021-09-03T15:53:27+5:302021-09-03T15:54:53+5:30
केंद्रातील मोदी सरकारचं धोरण सुरुवातीपासूनच लोकांना रोजगार मिळण्यास अनुकूल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली.
मुंबई - सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेल्याचेही या अहवालात म्हटले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारचं धोरण सुरुवातीपासूनच लोकांना रोजगार मिळण्यास अनुकूल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली. उद्योगधंद्याना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही आणि त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठल्याचे महेश तपासे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं सांगणारं मोदींचं सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले. याशिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकली नाही, ही वास्तवता समोर आल्याचेही ते म्हणाले.
काय सांगतो सीएमआयईचा अहवाल
दरम्यान, सीएमआयईच्या अहवालानुसार ऑगस्ट महिन्यात बेरोजगारी दरात वाढ होऊन 8.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्यात हा दर 6.95 टक्के एवढा होता. ऑगस्ट महिन्यात शहरातील बेरोजगारी जवळपास 1.5 टक्क्यांनी वाढून 9.78 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जुलै महिन्यात शहरातील बेरोजगारी 8.3 टक्के एवढी होती. याचप्रमाणे ग्रामीण बेरोजगारी दरही ऑगस्ट महिन्यात 1.3 टक्क्यांनी वाढून 7.64 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जुलै महिन्यात हा दर 6.34 टक्के एवढा होता.