आला फुलपाखरांचा महिना... विश्व उलगडणार! , देशभरातील २५ हून अधिक संस्था एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:26 AM2020-09-04T02:26:22+5:302020-09-04T02:27:05+5:30
फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. चतुर, सरडे, कोळी, माशा, पक्षी यांचे ते खाद्य आहे. परागीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. या फुलपाखरांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : देशात प्रथमच सप्टेंबर हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जात असून, यातून फुलपाखरांचे विश्व उलगडणार आहे. देशात कुठल्या ठिकाणी कुठल्या प्रजातींची फुलपाखरे आढळतात, त्यांचा अधिवास आदी अभ्यास केला जाईल. या मोहिमेसाठी देशभरातील २५ हून अधिक निसर्ग संस्था एकत्र आल्या आहेत.
फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. चतुर, सरडे, कोळी, माशा, पक्षी यांचे ते खाद्य आहे. परागीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. या फुलपाखरांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
‘फुलपाखरांचा महिना’ दिल्लीमध्ये गेल्या ३ वर्षांपासून साजरा केला जातो. यंदा पहिल्यांदाच देशपातळीवर तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या अंदाजे २७७ प्रजाती आढळतात. नीलवंत (ब्ल्यू मॉर्मन) फुलपाखरास राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देण्यात आला आहे. पश्चिम घाटातील काही भागांत फुलपाखरे आढळतात, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मंदार सावंत यांनी दिली.
अशी राबविली जाणार मोहीम
देशातील २४ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेश, २०० पेक्षा अधिक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून ही मोहीम राबविली जाईल. यात गणनेसाठीची जागा आपण ठरवायची आहे. केवळ अर्धा तास गणना करता येईल. यात प्रजातींची नोंद घेतली जाईल. शिवाय फोटो, व्हिडिओ, विविध स्पर्धांसह वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
जैवविविधतेचा भारताचा वारसा कायम ठेवण्यासाठी संयुक्त प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे वातावरणाच्या बाबतीत सुशिक्षित नागरिक तयार होतील. फुलपाखरू निवासस्थानांच्या संरक्षणासाठी ते कार्य करतील.
- कृष्णामेघ कुंटे, प्रोफेसर, एनसीबीएस
ज्ञान आणि अंमलबजावणी यांच्यातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. या महोत्सवात
सहभागी होतील त्यांना फुलपाखरे,
त्यांचे वर्तन, निवासस्थान आणि संवर्धनाबद्दल माहिती मिळणार
आहे.
- सोहेल मदन, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)