लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह द्रौणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असल्याने मान्सूनचा प्रवास सध्या वेगवान होत आहे. विशेषत: सद्य:स्थितीमध्ये निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वेगवान वाटचालीस पूरक आहे. ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्यासह मुंबईच्या वातावरणात मान्सूनपूर्व बदल नोंदवण्यात येत आहेत. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे वातावरण ढगाळ आहे. हवामान बदलाच्या या पार्श्वभूमीसह मान्सूनने यापूर्वीच दिलेल्या वर्दीनंतर कृष्णानंद होसाळीकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या चार ते पाच दिवसांत नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल कोमोरीन क्षेत्राचा दक्षिण भाग, नैर्ऋत्य, आग्नेय व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास स्थिती अनुकूल आहे. पश्चिमी वाऱ्याच्या बळकटीकरणामुळे आणि द्रौणीय क्षेत्र (शेअर झोन) उत्तरेकडे सरकल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच ३०-३१ मेपर्यंत दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, कामोरीन क्षेत्र आणि दक्षिण केरळच्या काही भागात होण्यास स्थिती अनुकूल आहे.मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मान्सून महिनाअखेरीस केरळात
By admin | Published: May 27, 2017 3:05 AM