सप्टेंबर महिन्यात मुंबईतील घरखरेदीचा आकडा होऊ शकतो सात हजारांच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:00+5:302021-09-25T04:07:00+5:30
मुंबई : लॉकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र सावरत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत सात हजारांपेक्षा अधिक घरांची खरेदी होऊ शकते. यामुळे ...
मुंबई : लॉकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र सावरत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत सात हजारांपेक्षा अधिक घरांची खरेदी होऊ शकते. यामुळे यंदाच्या सप्टेंबर महिन्यात घरखरेदीत मागील १० वर्षांचा विक्रम मोडला जाणार आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या २१ दिवसांमध्येच मुंबईत सहा हजारांहून अधिक घरांची खरेदी झाली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये मुंबईत एकूण ५,९१३ घरांची खरेदी झाली होती. आता पितृपक्ष असल्यामुळे मालमत्ता नोंदणीचा वेग कमी होणार आहे. दिवसाला मुंबईत ५० ते १०० घरांची नोंदणी झाल्यास येत्या ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत घरखरेदीचा सात हजारांचा टप्पा पूर्ण होऊ शकतो.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत दिवसाला सरासरी २२५ घरांची खरेदी झाली होती. सप्टेंबरमध्ये दिवसाला सरासरी ३०० घरांची खरेदी होत आहे. मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही घरखरेदीचा आकडा वाढत असल्याने बांधकाम क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गोदरेज प्रॉपर्टीज, मॅक्रोटेक, ओबेरॉय आणि सनटेक या कंपन्या मुंबईत बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहेत.