Join us

महापालिका व पोलिसांची दरमहा समन्वय बैठक

By admin | Published: November 01, 2015 2:29 AM

महापालिका आयुक्त अजय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिलेल्या आदेशानुसार दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिका व पोलीस यांच्यात योग्य समन्वय साधला जावा

मुंबई : महापालिका आयुक्त अजय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिलेल्या आदेशानुसार दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिका व पोलीस यांच्यात योग्य समन्वय साधला जावा, यासाठी प्रत्येक परिमंडळ स्तरावर समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.अजय मेहता व अहमद जावेद यांच्यात नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत महापालिका व मुंबई पोलीस यांच्यातील सुसंवाद व समन्वय वृद्धिंगत व्हावा या दृष्टीने अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान महापालिका व मुंबई पोलीस खाते यांच्यामध्ये समन्वयात्मक सुसंवाद साधला जाण्यासाठी एका निश्चित कार्यपद्धतीची आवश्यकता असण्याची गरज लक्षात आली. त्यानुसार आता दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी सकाळी १० वाजता परिमंडळ स्तरावर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच चौथ्या गुरुवारी सुटी असल्यास ही बैठक त्यानंतर येणाऱ्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळांचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त/पोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठक होणार आहे. ही बैठक पहिल्या महिन्यात महापालिकेच्या संबंधित परिमंडळीय उपायुक्तांच्या कार्यालयात, तर दुसऱ्या महिन्यात पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात या पद्धतीने आलटून-पालटून दोन्ही ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)