Join us

ज्येष्ठ नागरिकांना मासिक पास सक्ती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:10 AM

ज्येष्ठ नागरिकांना मासिक पासची सक्ती का?रेल्वे प्रवासी संघटनेचा सवाललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ नागरिकांना महिन्यातून केवळ ...

ज्येष्ठ नागरिकांना मासिक पासची सक्ती का?

रेल्वे प्रवासी संघटनेचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना महिन्यातून केवळ चार ते सहा वेळा लोकल प्रवास करावा लागत आहे, असे असताना ही त्यासाठी महिनाभराचा मासिक पास घ्यावा लागत आहे. तिकीट न देता पासची सक्ती का केली?, असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.

१५ ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास खुला केला. मात्र, अशा पात्र प्रवाशांना दैनिक तिकिटे न देता फक्त मासिक पास द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने रेल्वेला दिल्या.

साठ वर्षे वयाची व्यक्ती ही कायद्याने सेवानिवृत्त झालेली व्यक्ती असते. पेन्शनच्या कामासाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी जेमतेम चार-सहा वेळा लोकल प्रवास करावा लागतो. मात्र, तुम्ही पास काढा आणि बिनकामाचे लोकलला फिरा, कोरोना पसरवा आणि स्वत: ही मरा, असा सरकारचा हेतू आहे का? ज्येष्ठ नागरिकांना मासिक पास सक्ती करणे हा सरकारचा निव्वळ मूर्खपणाचा निर्णय आहे. - मनोहर शेलार, रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना जर लोकल प्रवास खुला केलाच आहे. मग, अशा पात्र प्रवाशांस तिकीट उपलब्ध करून द्या, अशा स्पष्ट सूचना रेल्वेला करायला हव्यात, असे मत संघटनेकडून मांडण्यात येत आहे. तिकीट मिळत नसल्याने रेल्वे कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांचे वांरवार खटके उडतात. भांडणे होतात. याला जबाबदार कोण? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून लोकांना छळणे राज्य सरकारने थांबवावे. दोन डोस घेतलेल्या पात्र प्रवाशाला पास आणि तिकीट दोन्ही मिळावे. तसेच लोकल चोवीस तास सर्वांसाठी खुल्या करत नसाल तर पुढील काही काळासाठी ११ ते ५ ही वेळ सामान्य लोकल प्रवाशांना पुन्हा द्यावी, अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे.