मुंबई : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत आल्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाच्या कामात मदत म्हणून माझा स्वतःचा एक वर्षाचा पगार आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण जवळपास २ कोटी रुपये तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची घोषणा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केली.
थोरात म्हणाले, अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कमही मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे आवाहन केले. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना अनेक लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकणाऱ्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो. इतर राजकीय पक्ष, संस्थांनी मदत करावी.