‘हप्ता लेते है’ म्हणत पोलिसाला मारणाऱ्याकडे ६ वर्षांचा दंड थकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 05:53 AM2023-12-03T05:53:34+5:302023-12-03T05:53:54+5:30
२३ हजार रुपये न भरता तो सुसाट रिक्षा चालवत असल्याचे उघड
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात ‘ट्रॅफिकवाले हफ्ता लेते है’, असे म्हणत बीकेसी वाहतूक विभागातील पोलिस हवालदार महेश चव्हाण (४९) या ऑनड्युटी कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी मोनू याने गेली सहा वर्षे दंडाची रक्कम भरली नाही. तरी देखील तो सुसाट रिक्षा चालवत भाडी मारत असल्याची माहिती मिळत आहे.
आरोपी मोनू याच्यावर निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार तो जी गाडी चालवत होता त्याची कागदपत्रे पोलिसांनी पडताळली. त्यावेळी २१ नोव्हेंबर, २०१८ पासून आतापऱ्यंत म्हणजे सहा वर्ष त्यांनी दंडच भरलेला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्या दंडाची ही रक्कम ही २३ हजार ७५० रुपये इतकी झाली आहे. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये २०२३ या वर्षात वाढ झाली आहे.
या घटनांची संख्या २०२२ मध्ये १९ वरून २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत २९ वर पोहोचल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले आहे. मात्र धक्काबुक्की किंवा बऱ्याचदा अपशब्द वापरण्याचे प्रकार घडतात जे रिपोर्ट झाल्यास हा आकडा अधिक फुगू शकतो. तेव्हा अशा हल्लेखोरांना लवकर जामीन मिळू नये, अशी तरतूद कायद्यात करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बीकेसीमधील प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यावर २५० हून अधिक गाड्यांची पडताळणी झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली
कारवाई का झाली नाही?
मोनू चालवत असलेल्या गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटही नसल्याचेही तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण त्याची ग्राह्यता २६ ऑक्टोबर, २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. ती गाडी बोरीवली आरटीओकडे ६ एप्रिल, २०१८ मध्ये रजिस्टर करण्यात आली असून इतकी वर्षे दंड न भरता तो गाडी कशी चालवत आहे? कारवाई का झाली नाही, असे सवाल उपस्थित होत आहेत.
पोलिसांवर हल्ले कराल तर भारतीय दंड संहिता कलम ३५३ अंतर्गत संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढे त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. - ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, सर्वोच्च न्यायालय