आयआयटी मुंबईत रंगला मूड इंडिगो
By Admin | Published: December 24, 2016 03:41 AM2016-12-24T03:41:51+5:302016-12-24T03:41:51+5:30
आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर त्याआधी स्वप्न पाहायला शिका. स्वप्न पाहिलीत तर पुढे जायची वाट सापडेल. स्वप्न पाहा
मुंबई : आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर त्याआधी स्वप्न पाहायला शिका. स्वप्न पाहिलीत तर पुढे जायची वाट सापडेल. स्वप्न पाहा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा जिद्दीने पाठलाग करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत. ते करण्याची तयारी ठेवा. यश आपोआप तुमच्या पदरात पडेल. अभ्यासावर लक्ष द्या. परंतु, तुमच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला लेखक, दिग्दर्शक वरुण अगरवाल याने दिला. शुक्रवारपासून या फेस्टची सुरुवात आयआयटी कॅम्पसमध्ये झाली.
आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू झालेल्या मूड इंडिगोमध्ये उपस्थित असलेल्या वरुण अगरवालने तरुणांशी संवाद साधला. नुकतीच सहामाही परीक्षा झाल्याने थोडेसे रिलॅक्स झालेले आयआयटीयन्स सध्या मूड इंडिगोमध्ये रंगलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन मूड इंडिगोच्या निमित्ताने दिसून येत आहे.
यंदाच्या मूड आयची संकल्पना मुंबईच्या जीवनमानावर आधारित आहे. महोत्सवाला राज्यासह देशभरातून तरुणांनी हजेरी लावली आहे. फेस्टमध्ये पंजाब, गुजरात, आसाम, बंगाल, राजस्थान, महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला नृत्यांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. पारंपरिक नृत्यप्रकार टिपण्यासाठी अनेकांचे मोबाइल कॅमेरे उंचावले होते. नाटक व नृत्य स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. बॉलीवूडच्या गाण्यांवरही नृत्य स्पर्धेचे आयोजन केले. नृत्याविष्कारातून गणपतीला मानवंदना देण्यात आली.
मुंबईत ड्रोन उडवण्यास परवानगी नसली तरी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ड्रोनची स्पर्धा मूड-आयमध्ये तरुणांनी एन्जॉय केली. उंच उडणारे ड्रोन पाहण्यासाठी तरुणांनी तुफान गर्दी केली होती. दुपारी एक वाजता डीजेंमध्ये स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे देशासह विदेशातील डीजे यात सहभागी झाले होते.
वॉल पेंटिंंंग, थ्रीडी पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध आकार, प्राण्यांमधून ‘मूड’ हा शब्द रंगवण्यात आला होता. अन्य भिंतींवर अॅबस्ट्रॅक फॉर्ममध्ये चित्रे काढली होती. कार्यक्रम पाहायला आलेल्या तरुणांनासुद्धा आपल्या विविध कला आणि प्रतिभा सादर करण्यासाठी ‘टॅलेंट हंट’चे व्यासपीठ उपलब्ध मूडआयच्या माध्यमातून करून देण्यात आले आहे.