चंद्राबाबूंप्रमाणे भाजपाला धडा शिकवू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:04 AM2018-04-10T02:04:57+5:302018-04-10T02:04:57+5:30
एनडीएमधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले; त्याप्रमाणे आता शिवसेनादेखील भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काल रात्री कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे झालेल्या कार्यक्रमात दिला.
मुंबई : एनडीएमधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले; त्याप्रमाणे आता शिवसेनादेखील भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काल रात्री कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे झालेल्या कार्यक्रमात दिला. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते.
२०१९ मध्ये भाजपा सत्तेवर येणार असल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सहा महिन्यांपूर्वी करत होते. मात्र, आता भाजपाची भाषा बदलली असून २०१९ मध्ये एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असल्याची घोषणा भाजपा करत आहे. आता चार वर्षांनंतर भाजपाला मित्रपक्षांची आठवण होत असल्याचा टोमणाही या वेळी सुभाष देसाई यांनी लगावला.
मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय सन्मान संमेलनाचे आयोजन कांदिवली (पूर्व) येथे केले होते. या वेळी मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा, शिक्षा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०० उत्तर भारतीय प्रतिष्ठित नागरिकांचा उद्योगमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विभागप्रमुख विलास पोतनीस, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका रिद्धी फुरसुंगे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, उपविभागप्रमुख सुनील डहाळे यांची उपस्थिती होती.
सुभाष देसाई पुढे म्हणाले, आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘मंदिर वही बनाएंगे’ ही घोषणा भाजपा गेली अनेक वर्षे करत आहे. कल्याणसिंग, राजनाथ सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते; आता आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री आहेत. मग अयोध्येत राम मंदिर का बांधले गेले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय झाला त्या वेळी हिंदूंच्या मागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले होते, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले, मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीयांशी शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला. पालिका निवडणुकीतही ८ पैकी शिवसेनेचे ६ नगरसेवक या समुदायाने निवडून दिले. त्यामुळे ऋण व्यक्त करण्यासाठी उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी संमेलन भरविल्याचे ते म्हणाले.
या संमेलनात भोजपुरी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारीलाल यादव व प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांनी या वेळी उपस्थितांचे मनोरंजन केले.