मुंबई : जगाचे कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच पर्यावरण मात्र स्वच्छ झाले आहे. लॉकडाउनच्या काळात ठिकठिकाणी घरी बसूनच विज्ञानाचे प्रयोग सुरू असून, निसर्ग न्याहळला जात आहे. मुंबईकरही निसर्ग पाहण्यात, अवकाश दर्शनात व्यस्त असतानाच गुरुवारच्या वैशाख पौर्णिमेनिमित्त नागरिकांना सुपरमूनचे दर्शन घडले.
अवघे अवकाश चंद्राच्या शीतल छायेने नटले असतानाच घरबसल्या अनेकांनी हा सुंदर क्षण पाहण्याचा आनंद अनेकांनी लुटला.गुरुवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वैशाख पौर्णिमा समाप्त झाली. बुधवारी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ६० किमी अंतरावर आला होता. सुपरमूनप्रमाणेच गुरुवारी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसत होते, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राकडील माहितीनुसार, दरवर्षी सर्वसाधारणरित्या बारा ते तेरा वेळा पूर्ण चंद्राचे दर्शन घडते. यातील तीन ते चार वेळा सुपरमून दिसतो. मात्र बहुतांश वेळा हे चंद्र आणि पृथ्वी या दोघांमधील अंतरावर अवलंबून असते. उदाहरण द्यायचे तर, या वर्षी केवळ २ वेळा सुपरमूनचे दर्शन झाले. एक मागील महिन्यात आणि एक आजच्या गुरुवारी. पुढच्या वर्षी २ वेळा सुपरमूनचे दर्शन घडेल. तो काळ एप्रिल आणि मे महिन्याचा असेल.