"नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 08:56 AM2023-05-13T08:56:51+5:302023-05-13T08:58:33+5:30

या आनंदोत्सवावरुन आता ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं आहे. 

"morality is in the masunda of Thane, while Urlisurli Laj is also open by the lake of Nagpur." Shivsena on Eknath Shinde and Devendra Fadanvis | "नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी"

"नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी"

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने १० महिन्यांनी निकाल जाहीर केला. या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटानेही आनंदोत्सव केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या तत्कालीन घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे, या सरकारची स्थापनाच बेकायदेशीर असल्याचं शिवसेना ठाकरे गटाने म्हटलं आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आमचं सरकार स्थीर असल्याचे सांगत शिंदे गटानेही जल्लोष केला. मात्र, या आनंदोत्सवावरुन आता ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजावून आणि विस्तृत करुन सांगितला. तसेच, लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली. त्यानंतर, ते शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. म्हणूनच, शिवसेनेनं मुखपत्रातून आज शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करताना श्रद्धा आणि सबुरी, आनंदाचा नंगानाच! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन करताना सर्वकाही चुकीचे केले, घटनाबाह्य केले, असे सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही या मंडळींना असा कोणता विकृत आनंद झालाय? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे. 

सर्व बेकायदेशीर असूनही सरकार वाचले याचा? की न्यायालयाने त्यांच्या निर्लज्जपणावर शिक्कामोर्तब केले याचा? येथे घटनेची चिंता आहे कोणाला? हमाम मे सब नंगे! तेव्हा प्रत्येकजण नंगा होऊन आनंदोत्सव साजरा करतोय. उघडे होऊन नाचत आहे. महाराष्ट्र हे सगळं पाहत आहे. जग त्यांच्यावर हसत आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवूया. सर्वोच्च न्यायालयाने उघडे पाडलेले लवकरच कायमचे घरी जातील, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

नैतिकता ठाण्याच्या तलावात बुडवली

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य ठरवले. हा संविधान पीठाचा निकाल आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विजयी हास्याने पत्रकारांसमोर आले व म्हणाले, ''आम्हीच जिंकलो आहोत. निकाल आमच्या बाजूनेच लागला. लोकशाहीचा विजय झाला,'' असे हसत हसत सांगणे याला मराठीत कोडगेपणा म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने या मंडळींना इतके उघडे-नागडे केले आहे की, त्यांच्या कमरेवर अंतर्वस्त्रही ठेवले नाही. अशा उघडय़ा अवस्थेत सिंहासनावर बसून हे निर्लज्ज मंडळ 'व्ही फॉर व्हिक्टरी'च्या खुणा करून आनंद उत्सव साजरा करत आहे. नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण उरलीसुरली लाजही नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचताना दिसत आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.    

Web Title: "morality is in the masunda of Thane, while Urlisurli Laj is also open by the lake of Nagpur." Shivsena on Eknath Shinde and Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.