मुंबई : पाहिले हॉटस्पॉट ठरलेले वरळी, अॅण्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, दादर हे विभाग कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र खबरदारी म्हणून दक्षिण मुंबईतील या विभागांमध्ये ‘मिशन झीरो’ अंतर्गत ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार सात मोबाइल क्लिनिकद्वारे या विभागांमधील संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.उपनगरात कोरोना रुग्णांची वाढ मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक असल्याने महापालिकेने मिशन झीरो जाहीर केले आहे. मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, भांडुप, मुलुंड या विभागात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोविड रुग्णांची संख्या शून्य व्हावी हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. हीच मोहीम दक्षिण मुंबईतील काही विभागांमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा आरंभ महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी लोअर परळ (पश्चिम) येथील हरी बाग मगन बाग कम्पाउंड येथून करण्यात आला. महापालिका, भारतीय जैन संघटना, क्रेडाई-एमसीएचआय आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दक्षिण मुंबईमध्ये राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दक्षिण मुंबईमध्ये डॉक्टर आपल्या दारीच्या सात मोबाइल क्लिनिक व्हॅन धावणार आहेत. या व्हॅन विशेष करून कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, अॅण्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर अशा विभागांमध्ये धावणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.>प्रमुख हॉटस्पॉटमध्ये कोरोनावर मातकोरोना हॉटस्पॉट बनलेल्या वरळी, धारावी, वडाळा, अॅण्टॉप हिल, डोंगरी या विभागांमध्ये झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती ही एकसमान समस्या होती. दाटीवाटीच्या वस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आव्हान ठरत असल्याने संशयित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण, जास्तीतजास्त लोकांची तपासणी, तत्काळ निदान व उपचार, योगा थेरेपी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप, प्रतिबंधित क्षेत्रात अन्नधान्याचा पुरवठा असे उपक्रम राबविण्यात आले. अशा अथक प्रयत्नानंतर या विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर मुंबईतील रुग्णवाढ सरासरीपेक्षा कमी आहे.>संशयितांची तत्काळ तपासणीया मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्ण सापडलेल्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम संशयितांची तपासणी करणार आहे. या स्क्रीनिंगदरम्यान आढळणाºया कोरोनाबाधितांची तत्काळ चाचणी करतील. एकही कोरोना रुग्ण सुटू नये यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.>कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे आतापर्यंत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सहयोग द्या , ‘मिशन झीरो’ आणि ‘डॉक्टर आपल्या दारी’ मोहीम यशस्वी करा.- किशोरी पेडणेकर, मुंबई महापौर
दक्षिण मुंबईतील हॉटस्पॉटकडे पुन्हा मोर्चा, पालिकेचे मिशन झीरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 1:26 AM