मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात आक्षेपार्ह कवितेविरुद्ध युवासेनेने आवाज उठविल्यानंतर, आता श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या महिला ३० सप्टेंबर रोजी मोर्चा काढणार आहेत, तर सोमवारी श्रमजीवी महिला ‘ठिणगी’च्या कार्यकर्त्या मुंबई विद्यापीठात धडकणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात ‘पाणी कसं असतं’ या शिर्षकाखाली प्रकाशित कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे, विनयभंग करणारे वर्णन केले आहे. या कवितेमुळे या समाजात विशेषत: महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. संबंधित कवीने अत्यंत अश्लील वर्णन करून, आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून, मुंबई विद्यापीठानेदेखील कोणताही विचार न करता ती कविता बीएच्या तिसºया वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाविरोधात आंदोलन छेडले जाणार आहे.कवीता अभ्यासक्रमातून वगळलीदरम्यान, युवासेना आणि सिनेट सदस्यांनी या कवितेविरुद्ध दिलेल्या निवेदनानंतर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाची विशेष बैठक शनिवारी घेण्यात आली. त्यात ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच पुढील परीक्षांमध्ये यावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही,असे ठरविण्यात आले असल्याचे प्रभारी कुलसचिव सुनील भिरूड यांनी सांगितले.विद्यापीठाचे बोर्ड आॅफ स्टडिज जेव्हा एखादी कविता, अभ्यासक्रमात समाविष्ट करतात, तेव्हा त्याचा ते स्वत: अभ्यास करतात का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.- सुप्रिया कारंडे,सिनेट सदस्य, युवासेना.