लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात वीज ग्राहकांना वीज कंपन्यांनी पाठविलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात शुक्रवारी दुपारी भाजप महिला आघाडीतर्फे महावितरणचे मुख्यालय असलेल्या वांद्रे येथील प्रकाशगडावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आघाडी सरकारच्या निर्णयांचा निषेध करीत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महिला मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊन काळात मध्य प्रदेश, गुजरात, केरळ या राज्यांनी वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. महाराष्ट्राने मात्र एका पैशाचीही सवलत ग्राहकांना देण्यास नकार दिला, असे म्हणत आंदाेलकांनी घोषणा सुरूच ठेवल्या. येत्या तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला या वेळी देण्यात आला.