मुंबई : राज्यात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होताच ओबीसी जाती निहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरुन सर्वच पक्ष आपापली भूमिका मांडताना दिसत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीनेही ओबीसींच्या जाती निहाय जनगणेनेची मागणी केली आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीने विधानभवनावर मोचा काढला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस बंदोबस्त विधानभवन परिसरात मोठ्याप्रमाणात लावण्यात आला होता. तसेच जमावबंदी देखील असताना नियम झुगारून वंचितने मोर्चा काढला. पण, यादरम्यान पोलिस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर पोलिसांनी वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून ओबीसींची फसवणूक केली जात आहे. जाती निहाय जनगणनेशिवाय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित इम्पेरीकल डाटा देता येणार नाही. दोन्ही सरकार या बाबतीत गंभीर दिसत नाही म्हणुन वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून ओबीसींच्या न्यायीक मागण्यांसाठी हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढला आहे.