विशेष फेरीसाठी १ लाख ८० हजारांहून अधिक जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:20+5:302020-12-22T04:07:20+5:30
अकरावी प्रवेश : माेठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची भीती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज ...
अकरावी प्रवेश : माेठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, या विशेष फेरीसाठी मुंबई विभागातून १ लाख ८४ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. तिसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ १४ हजार ६९ विद्यार्थ्यांनी तर आतापर्यंत १ लाख ३५ हजार ४३० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेशाला असलेला थंड प्रतिसाद पाहता, यंदा मुंबई विभागात अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली.
तिसऱ्या फेरीत ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते. मात्र, सुमारे ३१ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले. एकीकडे नामांकित महाविद्यालयातील जागा फुल्ल होत असलेल्या पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अनेक अनुदानित महाविद्यालयांतील जागा मात्र विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश झाले नाहीत, तर या तुकड्या बंद होण्याची भीती आहे.
* अर्ज सादर करण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंतची मुदत
अकरावीच्या विशेष फेरीसाठी नवीन विद्यार्थीही प्रवेश अर्जाचा भाग १ आणि २ भरू शकतील, तसेच ज्या विद्यार्थ्यांना या पूर्वीच्या फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित करण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता येईल. ते २२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतील. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर हाेईल आणि २६ तारखेपर्यंत विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकतील.