दहावीची दहा लाखाहून अधिक तर बारावीची २० लाखाहून अधिक डाउनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:41 PM2020-05-19T18:41:05+5:302020-05-19T18:41:39+5:30

बालभारतीच्या ई पुस्तकांचा विद्यार्थ्यांना होत आहे फायदा

More than 10 lakh downloads for 10th and more than 20 lakh downloads for 12th | दहावीची दहा लाखाहून अधिक तर बारावीची २० लाखाहून अधिक डाउनलोड

दहावीची दहा लाखाहून अधिक तर बारावीची २० लाखाहून अधिक डाउनलोड

Next


मुंबई : लॉकडाउनच्या काळात शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास मात्र सुरूच आहे. विशेष म्हणजे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बालभारतीच्या ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांमुळे खंड पडला नाही. बालभारतीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावीची १० लाखाहून अधिक तर बारावीची २० लाखाहून अधिक पुस्तके डाऊनलोड करण्यात आली आहेत. बालभारतीच्या ऑनलाईन उपलब्ध झालेल्या या पुस्तकांमुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा नेहमीप्रमाणे झाला असून अभ्यास लॉकडाऊनमध्ये अडकून पडला नाही.

राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२०-२१) बदलला आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यंदाही बालभारतीने मार्चअखेरीस बारावीची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते मात्र, लॉकडाऊन न उठल्यास विद्यार्थ्यांना दुकानांमध्ये ती पुस्तके पोहोचणे व पर्यायाने विद्यार्थ्यांना ती मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता बारावीची पुस्तके बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. पहिली ते अकरावीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने गेल्या वर्षीपर्यंत बदलण्यात आला. या अभ्यासक्रमाची पुस्तके वेबसाइटवर पूर्वीपासूनच ऑनलाइन उपलब्ध आहेत तशीच ती यंदाही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे पहिली ते अकरावीची तब्बल ६१ लाख २० हजार ७०० पुस्तके बालभारतीच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली आहेत. याशिवाय या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत ५ कोटी ७३ लाख ३०  हजार २६९  मोफत पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत ३ कोटी ८७  लाख ५ हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी दिली.

पाठ्यपुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना करता येणार ऑनलाइन नोंदणी
राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्‍हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरीता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्‍तक मंडळाने यंत्रणा विकसित  करण्यात आली आहे .  पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने २४ तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आय. डी. व पासवर्ड देण्यात येत असून  त्‍याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे. बॅंक ट्रान्सफर/क्रेडीट अथवा डेबीट कार्ड तसेच आरटीजीएस / एनईएफटीच्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट - वे मार्फत  करता येणार आहे. मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना एसएमएस पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमध्ये गर्दी टाळता येणे शक्‍य होणार आहे.
 

संचारबंदीमुळे पुस्तकांचे वितरण करणे बालभारतीला शक्य नसल्याने अभ्यासक्रमाचे साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार अभ्यासक्रमाची पुस्तके वेबसाइटवर डाऊनलोड करण्यात आली आहेत. विद्यार्थायंचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा ऑनलाईन पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.  
- विवेक गोसावी , संचालक , बालभारती  

Web Title: More than 10 lakh downloads for 10th and more than 20 lakh downloads for 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.