चोरीची लाइट, चोरीचे पाणी : शौचालयांचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सव्वा ते पावणेदोन कोटी लोकसंख्येला सामावून घेणारी मुंबई दिवसागणिक हातपाय पसरत आहे. मात्र मुंबईची वाढ होत असतानाच मुंबईत सातत्याने अनधिकृत बांधकामांचीही भर पडत आहे. मुंबईतल्या अभ्यासकांच्या मते मुंबईतील १० टक्के बांधकामे अनधिकृत असून, यात झोपड्या, चाळी, इमारती अशा अनेक घटकांचा समावेश आहे.
मुंबईचा विकास होत असला तरी मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधून त्याचे पक्क्या घरात रूपांतर करण्यात आजही झोपडीदादा कार्यरत आहेत. मुंबईत जेथे मोकळ्या जागा आहेत तेथे अशा प्रकाराची कच्ची किंवा पक्की बांधकामे होत असतात. विशेषत: वडाळा येथील कोरबा मिठागर, शिवडी येथील खाडीकिनाऱ्याचा भाग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी येथील तिवरांची कत्तल करून उभी राहणारी वस्ती, वांद्रे-कुर्ला संकुलालगतच्या मिठी नदीलगत माेठ्या प्रमाणावर अशा झाेपड्या उभ्या राहत आहेत. मालाड आणि मालवणी परिसरात तिवरांची कत्तल करून झोपड्या उभारल्या जातात. नंतर त्याची पक्की घरे होतात. मात्र या घरांची, या बांधकामांची नोंद नसल्याने महापालिका त्यांना सेवासुविधा देत नाही.
अशा झोपड्यांत चोरीचे पाणी अव्वाच्या सव्वा दराने विकले जाते. चोरीची लाइट वापरली जाते. शौचालयही नसते. परिणामी उघड्यावर, रेल्वेमार्गालगत किंवा महापालिकेच्या शौचालयांना पैसे देऊन त्याचा वापर केला जातो.
* ठाेस माहिती मिळत नाही
मुंबई महापालिका बांधकामांची माहिती नीट देत नाही. १९७०, १९९०, २०२०चा अभ्यास केल्यास साहजिकच बांधकामे वाढल्याचे निदर्शनास येते. अनधिकृत झोपड्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. झोपड्यांच्या पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ असतो. एसआरएचे किती प्रकल्प प्रामाणिकपणे राबविले गेले, याचे उत्तर मिळत नाही. अनधिकृत झोपड्यांचा आकडा हजारो आहे. १० टक्क्यांपेक्षा अधिक आकडा अनधिकृत बांधकामांचा असू शकतो. मात्र महापालिका किंवा कोणतेच प्रशासन याबाबत ठोस माहिती देत नाही.
- डॉ. सुरेंद्र मोरे, अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा को.ऑप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड
---------------