मुंबई : संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची मजा घेतली जाते. मात्र, या पतंगासाठी वापरात असलेल्या धारदार मांजामुळे मुंबईत शंभरहून अधिक पक्ष्यांवर संक्रांत ओढावली आहे. परळ येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत मांजामुळे जखमी झालेले ७० हून अधिक पक्षी उपचारांसाठी आणले असून, पशू वैद्यकीय रुग्णालयातर्फे दोन दिवसांत मुंबईभर ६० हून अधिक पक्ष्यांवर आॅन दी स्पॉट उपचार करण्यात आले.दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी मुंबईत पतंगबाजांमुळे मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होतात, तर मृत पक्ष्यांची संख्याही अधिक असते. पतंगाच्या मांजामुळे अनेक ठिकाणी विविध पक्षी जखमी होतात. त्यांना परळच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले जाते, तसेच अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्राणी-पक्षीप्रेमीदेखील पक्ष्यांवर उपचार करतात. त्यांना रुग्णालयात अथवा पक्ष्यांवर उपचार करणाºया संस्थांमध्ये दाखल केले जाते. यंदाही मुंबईतून जखमी पक्ष्यांना घेऊन पक्षीप्रेमी पशू वैद्यकीय रुग्णालयात आल्याची माहिती परळ येथील पशू वैद्यकीय रुग्णालयाने दिली.मांजामुळे जखमी झालेल्या शेकडो पक्ष्यांना रुग्णालयात उपचारांसाठी आणले जाते. येथे त्यांच्यावर उपचार केले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये जखमी पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. मोठ्या प्रमाणावर केली जाणारी जनजागृती व प्राणिप्रेमींच्या चळवळींना मिळालेले हे यश आहे. पुढील काळात हे प्रमाण अजून कमी होईल.- डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, पशू वैद्यकीय रुग्णालय, परळसंक्रांतीच्या दिवशी आम्ही मुंबईत विविध ठिकाणी जखमी पक्ष्यांवर उपचार करून, त्यांना पशू वैद्यकीय रुग्णालयात दाखल करत होतो. अनेक प्राणी-पक्षीप्रेमी जखमी पक्ष्यांना घेऊन आमच्याकडे येत होते, परंतु आता त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.- सुनिश कुंजु, सचिव,प्लॅन्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी
पतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांवर आली संक्रांत, १०० हून अधिक पक्षी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:10 AM