- सीमा महांगडे
मुंबई : कोविड समय येता कोण कामास येतो ? हा वाक्प्रचार म्हणण्याची वेळ फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर मागील एक वर्षांपासून आली. मात्र या संकट समयी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआर भारताच्या मागे आपलया तंत्रज्ञान आणि संशोधनासह ठाम उभी राहिली. या काळात तब्बल १०० अधिक संशोधने सीएसआयआरमार्फत लोकांच्या उपयोग व प्रत्यक्ष वापरासाठी बाजारात आणली गेल्याची माहिती सीएसआयरचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी दिली.
देशभरातल्या तब्बल ६० ते ७० औद्योगिक संस्थांशी भागीदारी करून , त्यांच्या सहाय्याने कोविड काळात हर्बल सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण स्प्रे, व्हेंटीलेटर्स , ऑक्सिजनेटर्स, अत्याधुनिक मास्क, तात्काळ रुग्णालये उभारून देणारे तंत्रज्ञान, आरएनए / डीएनए डायग्नोस्टिक्स, नॉवेल वॅक्सीन, रीपर्पज वॅक्सीन अशी १०० हून अधिक संशोधने बाजारात उपलब्ध करून दिली आहेत.
मार्चपासून देशात डब्ल्यूएचओमार्फत कोविड १९ जाहीर करण्यात आला मात्र सीएसआयआरच्या स्ट्रॅटर्जी ग्रुपच्या बैठका या २५- २६ फेब्रुवारीपासूनच नियमित सुरु झाल्या होत्या. त्यामुळे कोविड १९ च्या आव्हानाला सीएसआयर आणि त्याच्या देशातील ३७ वैज्ञानिक शाळा सज्ज झाल्या होत्या. आज जगातील कोरोना संसर्गाशी भारताशी तुलना केली असता त्यासाठीच्या संशोधनामध्ये जगातील पहिल्या ३ देशांत भारताचा क्रमांक नक्कीच लागेल अशी खात्री डॉ मांडे यांनी व्यक्त केली. सीएसआयआरच्या स्ट्रॅटर्जी बैठका आजही सुरु असून विविध प्रकारच्या संशोधने आणि उत्पादनांवर काम सुरूच असल्याची महिती त्यांनी दिली.
या विविध प्रकारच्या संशोधनासाठी केंद्र किंवा कोणत्याही राज्य शासनाकडून आर्थिक मदत न घेता विविध मोठ्या उद्योगांची मदत घेऊन ती पूर्णत्त्वास नेली असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी अगदी टाटा , रिलायन्स, एल अँड टी, सन फार्मास्युटिकल्स भारत फोर्स सारख्या मोठ्या कंपन्यांच्या उद्योजकांनी उत्पादने बाजरात आणण्यास हातभार लावल्याचे त्यांनी नमूद केले.
संशोधनाला गती मिळण्यासाठी शासनाची मदत आवश्यक विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारावरची संशोधने ही मानवी जीवनाला अनेकदा नवीन जीवदान देणारी ठरत असतात त्यामुळे साहजिकच प्रत्येक क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणे, त्यात त्यांचा वापर प्रत्यक्षात होणे आवश्यक आहे. भारतात कोविड काळात संशोधनाला चांगली गती मिळाली असली तरी हा काळ सोडूनही देशातील संशोधनांना चालना मिळण्याची आवश्यकता आहे. देशातील अनेक विषय, त्यावरील संशोधने यांना तातडीने चालना मिळून ते विषय सोडविले गेले पाहिजेत. यासाठी फक्त शासनाचीच मदत नाही तर औद्योगिक कंपन्यांची , शिवाय लोकांची मदत महत्त्वपूर्ण असणार असल्याची डॉ शेखर मांडे यांनी दिली.
महाराष्ट्रात लॉकडाऊनची गरज नाही मात्र काळजी बाळगण्याची गरज रुग्णसंख्या वाढत असली तरी महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट करत किंवा लोकल पुन्हा बंद करण्याची गरज नसल्याचे डॉ शेखर मांडे यांनी स्पष्ट केले. चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, गर्दी टाळणे, ज्या भागातरुग्णसंख्या जास्त आहे तेथे आयसोलेशन , क्वारंटाईन सारखे पर्याय अवलंबणे यांसारख्या पर्यायांचे कटाक्षाने पालन करायला हवे असे त्यांनी ठळकपणे नमूद केले.