लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात नवजात बालक ते ९ वर्षांखालील तब्बल १२ हजार ९० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच २६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्याने पालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक तयारी सुरू केली आहे. सध्या असलेल्या कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी खाटांची उपलब्धता असणार आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १० ते १९ वयोगटातील ३१ हजार ५० मुलांना कोरोनाची लागण झाली असून ४५ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सध्या २८ हजार ३१० सक्रिय रुग्ण आहेत. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या ७ लाख २ हजार ५३२ असून, मृतांचा आकडा १४ हजार ७७८ इतका आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात मागील वर्षाच्या मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. गेल्या वर्षभराच्या काळात ५६ लाख ३५ हजार ११९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ९१ हजार ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण बरे झाले असून, ३ लाख १५ हजार ४२ सक्रिय रुग्ण आहेत. यात नवजात बालक ते १० वयोगटातील १ लाख ७३ हजार ८५५ बालकांना तसेच १० ते २० वयोगटातील ४ लाख ४०० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत १० वयोगटाखालील बालकांचे प्रमाण ३.०९ टक्के तर १० ते २० वयोगटातील मुलांचे प्रमाण ७.११ टक्के आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिली आहे.
बालरोगतज्ज्ञांची टास्क फोर्स
कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ. बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ. प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. हृषीकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जून महिन्यात लसीची क्लिनिकल ट्रायल
भारत बायोटेक आणि इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च यांनी मिळून विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांवर चाचण्या करायला भारत सरकारने मान्यता दिली आहे. २ ते १८ या वयोगटातील ५२५ मुला-मुलींवर देशभरात ही चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेक जून महिन्यात या चाचण्या सुरू करणार आहे.
................................