राज्यातील १.३० लाखांहून अधिक पाेलिसांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:08 AM2021-03-13T04:08:11+5:302021-03-13T04:08:11+5:30
* २० हजार अधिकारी, तर१४ हजार महिला पोलीस जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...
* २० हजार अधिकारी, तर१४ हजार महिला पोलीस
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध पोलीस घटकांतील तब्बल १ लाख ३० हजारांंहून अधिक खाकी वर्दीवाल्यांनी कोराना प्रतिबंधात्मक लस घेतली.
महाराष्ट्रात आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनंतर फ्रंटलाईन कोरोना याेद्ध्यांची संख्या जवळपास अडीच कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये १.९७ लाख पोलिसांसह ४३ हजारांहून अधिक होमगार्ड व उर्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेच्या समन्वयकांची जबाबदारी राज्य पोलीस दलातील अप्पर महासंचालक (अस्थापना) के. के. सरंगल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मरोळ पोलीस प्रशिक्षण विभागातील उपायुक्त तुषार दोशी हे त्यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध घटकांशी संपर्कात राहून मोहिमेची कार्यवाही करीत आहेत.
डिसेंबर महिन्यापासून विविध ६५ पोलीस घटकांतील संबंधित वर्गाची नावे निश्चितीचे काम करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष ३ फेब्रुवारीपासून लस देण्याला सुरुवात करण्यात आली. आतपर्यंत राज्यातील एकूण १ लाख ३० हजार फ्रंटलाईन काेराेना याेद्ध्यांना ही लस देण्यात आली. त्यामध्ये २० हजारांहून अधिक पाेलीस अधिकारी तर उर्वरित सहायक फौजदार ते कॉन्स्टेबलपर्यंतचे कर्मचारी आहेत. त्यामध्ये १४ हजारांहून अधिक महिला पोलिसांनी ही लस घेतली. तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास १० हजारांहून अधिक पोलिसांनी ही लस घेतली.
* लसीचा त्रास झाल्याची एकही घटना नाही
विविध पोलीस घटकांत तेथील परिस्थितीनुसार त्याचे नियोजन केले आहे. लस दिल्यानंतर संबंधितांना एक दिवस विश्रांती दिली जात आहे. लस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबाँडीज निर्माण झाल्यानंतर त्याचा त्रास झाल्याची एकही घटना नाही.
- के. के. सरंगल (अप्पर पोलीस महासंचालक व लसीकरण समन्वयक, महाराष्ट्र)
--------------------