लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने राज्यात विक्रम केला आहे. एकाच दिवसात राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले असून हा लसीकरणाचा नवा विक्रम महाराष्ट्राने नोंदवला आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात १५ लाख ३ हजार ९५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यात ६ कोटी ५५ लाख ८२ हजार ८७८ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.
राज्यात २१ लाख ४१ हजार ६३८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १५ लाख ७५ हजार ७५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी १६ लाख ५० हजार ६७८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी २२ लाख ५४ हजार ७३५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
१८ ते ४४ वयोगटातील २ कोटी २५ लाख ११ हजार ३३४ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३१ लाख ३१ हजार १९८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ९२ हजार ९५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख २४ हजार ५८८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.