माेहिमेंतर्गत अद्याप १,६३३ शाळांची नाेंदणी बाकी
सीमा महांगडे
मुंबई : फिट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनांच्या पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत २७ डिसेंबर आहे. मुंबई शहरातील २,५५० पैकी १,११५ शाळांनी तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील १,७६७ पैकी १,५६९ शाळांनी आतापर्यंत नोंदणी केली. मात्र, अद्याप जिल्ह्यातील १,६३३ शाळांची नाेंदणी बाकी आहे.
केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’अंतर्गत ‘फिट इंडिया’ हा उपक्रम राबविला आहे. सरकारच्या साई केंद्रांतर्गत देशभरातील गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या विदेशी खेळाडूंना पहिलीपासून शाेधून त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. आठ-दहा वर्षे दिल्या जाणाऱ्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे भविष्यात ती मुले देशासाठी ऑलिम्पिकमधील पदक जिंकतात. अशाच प्रकारे आपल्याकडे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांची माहिती ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सरकार संकलित करणार आहे. ज्या मुला-मुलींची शारीरिक क्षमता अधिक चांगली आहे, अशांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण साईमार्फत भविष्यात दिले जाऊ शकते. त्यासाठी फिट इंडियाअंतर्गत शाळांनी नोंदणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
मुंबई जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत उपसंचालक कार्यालयांतर्गत ४ हजार ३१७ शाळा आहेत. त्यामधील ६२ टक्के शाळांनी २४ डिसेंबरपर्यंत नोंदणी केली असून ३८ टक्के शाळांची नोंदणी बाकी आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच प्रभारी आहेत. शाळेतील मुलांच्या क्रीडा गुणांना विकसित करण्यासाठी सर्व शाळांवर क्रीडा शिक्षक नियुक्त करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक व्यक्त करत आहेत.
* कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू
वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत शाळांची ऑनलाइन नोंदणी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या निर्धारित वेळेत शाळांची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची नोंदणी व्हावी, यासाठी आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.
- संदीप संगवे, उपसंचालक, मुंबई विभाग
----------------------------