मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात १५,०५१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, ४८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३,२९,४६४ झाली असून बळींचा आकडा ५२,९०९ झाला आहे. तर दिवसभरात १०,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण २१,४४,७४३ बधितांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०७ टक्के एवढे आहे. तर सध्या राज्यात १,३०,५४७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत तपासलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६,११४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर सध्या राज्यातील मृत्युदर २.२७ टक्के एवढा आहे.
राज्यात सोमवारी नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४८ मृत्यूंमध्ये मुंबई ४, नवी मुंबई ३, पनवेल मनपा १, नाशिक १, अहमदनगर १, जळगाव १, सोलापूर २, सोलापूर मनपा २, सातारा १, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा ३, लातूर १, उस्मानाबाद १, बीड २, अमरावती ३, अमरावती मनपा ४, बुलडाणा १, नागपूर १, नागपूर मनपा २, वर्धा १० इ. रुग्णांचा समावेश आहे.
................
मुंबईत दिवसभरात सतराशेहून अधिक रुग्ण
मुंबईत दिवसभरात १,७१२ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ६५९ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ५३५ झाला आहे.
शहर उपनगरात दिवसभरात १ हजार ६३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३ लाख १८ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या १४,५८२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहर उपनगरात ८ ते १४ मार्च या कालावधीत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे.