राज्यात १७ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:05 AM2021-04-18T04:05:52+5:302021-04-18T04:05:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा जोर वाढत असून आरोग्य कर्मचाऱ्यांभाेवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होताना ...

More than 17,000 health workers affected in the state | राज्यात १७ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित

राज्यात १७ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा जोर वाढत असून आरोग्य कर्मचाऱ्यांभाेवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. राज्यात १७ हजार ९७५ कोरोनायोद्धे कोरोनाबाधित झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली. धक्कादायक बाब म्हणजे १७ हजार ९७५ पैकी राज्यात १७८ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात १०७ सरकारी, तर ७१ खासगी डॉक्टर आहेत.

राज्यातील बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार २३५ कोरोनायोद्धे सरकारी असून ६ हजार ७४० खासगी आहेत. डॉक्टरांची आकडेवारी पाहिल्यास ५ हजार ९१३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण १७ हजार ९७५ रुग्णांमध्ये ४ हजार २१६ नर्स असून ७ हजार ८४५ पॅरामेडिकल स्टाफचा समावेश आहे.

देशभरातील ७४७ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात बंगालमधील ८५, आंध्र प्रदेशमधील ७०, उत्तर प्रदेशातील ६६, कर्नाटकमधील ६८, गुजरातमधील ६२, बिहारमधील २२, दिल्लीतील २२, आसाम २० आणि पंजाब २० आदींचा समावेश आहे.

* नागरिकांनाे, कृपया सहकार्य करा!

मागील वर्षभरापासून कोरोनायोद्धे काेराेनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र काम करीत आहेत. अतिरिक्त ड्युटीच्या वेळा, शारीरिक थकवा, मानसिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा सर्व आघाड्यांवर लढताना या योद्ध्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे आतातरी कोरोनाविषयी बेफिकिरी सोडून नागरिकांनी नियमांचे पालन करून यंत्रणांना साहाय्य करावे, अशी अपेक्षा आयएमएचे डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी व्यक्त केली.

--------------------------

Web Title: More than 17,000 health workers affected in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.