Join us

१७ हजारांहून अधिक जणांनी घेतली ‘स्पुतनिक’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:09 AM

डोस घेणाऱ्यांमध्ये होतेय दिवसागणिक वाढ

मुंबई :  मुंबईत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीनंतर स्पुतनिक लसीचे लाभार्थीही दिवसागणिक वाढत आहेत. या लसीचे डोस महाग असले तरीही अत्यंत कमी दिवसांत कोरोना सुरक्षा कवच मिळत आहे. या लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर केवळ २१ दिवसांचे आहे. शहर उपनगरात आतापर्यंत १७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी ही लस घेतली आहे.मुंबईसह राज्यभरात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर रशियानिर्मित स्पुतनिक लस उपलब्ध झाली. शहर उपनगरात १२ हजार १६२ लाभार्थ्यांनी स्पुतनिकचा पहिला डोस, तर ५ हजार ७३७ लाभार्थ्यांनी स्पुतनिकचा दुसरा डोस घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आतापर्यंत ७५ लाख १५ हजार ५१७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५६ लाख ४५ हजार ९४५ आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १८ लाख ६९ हजार ५७२ आहे.स्पुतनिक या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या चाचणीत कोरोनाबाधित रुग्णांच्या शरिरात प्रतिकारकशक्ती निर्माण झाली, असे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे. या रुग्णांच्या शरीरात लसीनंतर प्रतिकारकशक्ती निर्माण होणे व नैसर्गिकदृष्ट्या एखाद्याच्या शरीरात प्रतिकारकशक्ती निर्माण होणे यात फारसा फरक आढळलेला नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.स्पुतनिक व्ही लसीविषयीस्पुतनिक व्ही ही लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. ही लस रशियाने बनवली आहे. अमेरिकेत बनलेल्या फायजर आणि मॉडर्ना या लसी ९० टक्के प्रभावी आहेत; मात्र स्पुतनिक व्ही लसीने त्यापुढे मजल मारली आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसी उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस ८१ टक्के प्रभावी आहे. तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस ८० टक्के प्रभावशाली आहे.

टॅग्स :कोरोनाची लस