मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांत राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी येत्या ६ एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत मंगळवार (दि. ३०)पर्यंत राज्यातील एकूण ९६,६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५७९ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा ९,४३२ शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण ९६,६८४ जागा उपलब्ध आहेत. त्यानोंदणीची मुदत संपल्यावर आता सहा एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ‘डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह’ करण्याचे काम पूर्ण करावे. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरटीई २५ टक्के या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारने तीन वर्षांपासून दिलेली नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका खासगी शाळाचालकांनी घेतली आहे. राज्यातील जवळपास चार हजारांहून अधिक खासगी शाळांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार शुल्क प्रतिपूर्ती देत नाही आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव टाकत आहे. त्यामुळे या शाळांनी या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्यातील जवळपास चार हजारांहून अधिक खासगी शाळांनी घेतल्याच्या प्रतिक्रिया संस्थाचालकांनी दिल्या. त्यामुळे आता लॉटरी घोषित झाल्यावर या शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शासन काय पावले उचलणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील आरटीईच्या ९६ हजार जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:31 AM