मुंबई हवाई हद्दीतील अतिरिक्त २०० विमाने होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:06 AM2019-07-17T06:06:11+5:302019-07-17T06:06:15+5:30
पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर भारतीय विमानांसाठी सुरू करण्यात आल्याने मुंबई विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाच्या नियंत्रकांवरील कामाचा ताण कमी होऊ लागला आहे.
खलील गिरकर
मुंबई : पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर भारतीय विमानांसाठी सुरू करण्यात आल्याने मुंबई विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाच्या नियंत्रकांवरील कामाचा ताण कमी होऊ लागला आहे. या निर्णयामुळे मुंबई हवाई हद्दीतील २०० विमानांचा अतिरिक्त भार कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाढलेला ताण पूर्णपणे कमी होईल, असा विश्वास नियंत्रकांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानी हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद करण्यात आल्यानंतर मुंबई हवाई हद्दीत २४ तासांत नेहमीपेक्षा सुमारे ६०० विमानांची संख्या वाढली होती. त्यामुळे हवाई नियंत्रण कक्षामध्ये हवाई वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या नियंत्रकांच्या कामात प्रचंड वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ००.३८ वाजता व भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास प्रारंभ करण्यात आला. पाकिस्तानी हवाई हद्द बंद असल्याने त्याचा वापर टाळण्यासंदर्भात वैमानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ८ ते १० नोटाम (नोटीस टु एअरमन) कार्यान्वित करण्यात आले होते. ते सर्व नोटाम आता रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी हवाई हद्द खुली झाल्यानंतर त्या वेळी ज्या विमानांनी उड्डाण केले होते व जी विमाने हवेत होती त्यांचा मार्ग बदलण्यात आला नाही, त्यांचा प्रवास निश्चित मार्गानुसार पार पाडण्यात आला. मात्र त्यानंतर जी विमाने उड्डाण करणार होती त्यांचा मार्ग बदलण्यात आला. या हवाई हद्दीचा वापर सुरू झाल्याने मुंबईच्या हवाई हद्दीतून प्रवास करणाºया अतिरिक्त २०० विमानांची वाहतूक पूर्वीच्या मार्गाने होणार असल्याने मुंबई हवाई हद्दीतील कामाचा ताण कमी होईल.
>ंकेबिन क्रूच्या मागणीत २५ टक्के घट
पाकिस्तानी हवाई हद्द बंद झाल्याने एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाºया विमानांच्या प्रवास वेळेत ९० मिनिटांची वाढ झाली होती व अतिरिक्त इंधन वापरावे लागत होते. त्यामुळे ही विमाने व्हिएन्नामध्ये थांबवावी लागत असत व तेथे केबिन क्रू बदलले जात असत. या सर्व प्रक्रियेला ३ तास लागत होते. आता ही विमाने थेट अमेरिकेला जाणार असल्याने केबिन क्रू मागणीमध्ये २५ टक्के घट होईल, अशी माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली. अमेरिकेला जाणाºया विमानाच्या खर्चात प्रति फेरी २० लाख रुपयांची वाढ झाली होती तर युरोपला जाणाºया विमानाच्या खर्चात ५ लाख वाढ झाली होती, ती आता कमी होईल, असा विश्वास धनंजय कुमार यांनी व्यक्त केला.