मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच आम्ही वंचित कामगारांना मिळणाऱ्या फायद्याचे लक्षित वितरण सुनिश्चित करण्याचे मार्ग, उपाय शोधत आहोत. आमच्या विमाधारक व्यक्तीचे जीवन व उपजीविका सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका निभावण्याच्या मार्गावर केंद्र सरकारने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कोविड रिलिफ स्किमने उपाय योजनांच्या यादीत भर पडली आहे. यामध्ये अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेसारख्या योजनांचा समावेश असून, महाराष्ट्रात आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने १५ ईएसआयसी - ईएसआयएस रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी समर्पित असलेले २ हजारपेक्षा अधिक बेड्स सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे प्रादेशिक संचालक, अतिरिक्त आयुक्त प्रणय सिन्हा यांनी सांगितले.
कोरोनामुळे लाभार्थ्यांना व त्यांच्या आश्रितांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कोविड रिलिफ स्कीम सुरू केल्याचे सांगत प्रणय सिन्हा म्हणाले, सदर योजनेसंदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत. सार्वजनिक तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा तपशिल ईएसआयसीच्या वेबसाईट www.esic.nic.in वर उपलब्ध आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने १५ ईएसआयसी / ईएसआयएस रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी समर्पित असलेले २ हजारपेक्षा अधिक बेड्स सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. कर्मचारी राज्य विमा योजना महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात पूर्णत: तर ९ जिल्ह्यात अंश स्वरुपात कार्यान्वित आहे. राज्यात उपक्षेत्रीय ६ कार्यालये आहेत.
यात पुणे, मरोळ, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकचा समावेश आहे. राज्यात ७९ शाखा कार्यालये आहेत. यात ६७ शाखा कार्यालये व १२ औषधालयांसह शाखा कार्यालये आहेत. १५ रुग्णालये आहेत. अटल विमीत कल्याण योजनेंतर्गत गतवर्षी ७ हजारपेक्षा अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत. तसेच ९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे.