राज्यात आठवडाभरात २ हजारांहून अधिक कोरोनाबळी
दुसऱ्या लाटेचा दुष्परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून, दिवसागणिक संसर्गाचा विळखा घट्ट होत आहे. राज्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवडाभरात काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत राज्यात २ हजार १०० कोरोनाबळींची नोंद झाली.
राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिल रोजी दिवसभरात ३७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ११ हजार ९७५ बाधितांना काेराेनामुळे जीव गमवावा लागला. राज्याच्या मासिक मृत्यूदराचे प्रमाण फेब्रुवारीत ०.८ टक्का होते. मार्च महिन्यात ते ०.४ टक्क्यावर आले. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवडाभरात हे प्रमाण ०.५ टक्क्यावर पोहोचले. राज्यात दिवसाला २ लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, कोरोना मृत्यूंचे प्रमाण राज्यात हळूहळू वाढते आहे. यामागे उशिराने होणारे निदान, खाटांचा अभाव, सहवासितांचा शोध घेण्यास कमतरता, ही कारणे असू शकतात. मात्र, आता टास्क फोर्सच्या मदतीने वेळोवेळी याविषयी सल्लामसलत सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य हाेईल.
मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत दैनंदिन रुग्णांत १५ टक्क्यांची घट झाली आहे. १० हजार रुग्णांची नोंद काही दिवसांपूर्वी सलग होत होती, ती आता ८ हजार ९३८ वर आली आहे. केंद्राकडून मुंबईत आलेल्या विशेष पथकाने मुंबईतील विलगीकरण व्यवस्था आणि लसीकरणाचे व्यवस्थापन उत्तम असल्याचे सांगितले. मुंबईत दिवसभरात ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या.
.................................