मुंबई : मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले आणि ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला यंदा भरघोस प्रतिसाद मिळाला. वांद्रेतील एमएमआरडीएच्या मैदानात बुधवारी अखेरच्या दिवशीही मुंबईकरांनी खरेदीसाठी एकच झुंबड केली. यंदाच्या महोत्सवाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात झाली आहे.यंदा महाराष्ट्रासह २९ राज्यांतील स्वयंसाहाय्यता गट व ग्रामीण महिला कारागीर सहभागी झाल्या. ५११ स्टॉलपैकी ७० स्टॉल खाद्यपदार्थांचे होते. या महोत्सवात दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही रसिकांनी अनुभवली. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होते. यामध्ये जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा - पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदूळ इत्यादी बाबी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कोल्हापुरी चप्पल, आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू, पैठणी साड्या यांसह देशातील विविध २९ राज्यांतील कारागिरांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद मुंबईकरांनी लुटला.‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल स्वयंसाहाय्यता गट दरवर्षी करीत असतात. दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे ८ हजार स्वयंसाहाय्यता समूहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्या वर्षी ५० लाखांची आर्थिक उलाढाल झाली होती तर मागील वर्षी जवळपास १५ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला. या वेळच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून १५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती ‘उमेद’ अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बचत गटांना पारितोषिकेसर्वाधिक विक्री उत्पादने (महाराष्ट्र) : हरिओम स्वयंसाहाय्यता गट, जि. लातूर यांना प्रथम क्रमांक, वरद विनायक स्वयंसाहाय्यता गट, रायगड यांना द्वितीय तर विघ्नहर्ता स्वयंसाहाय्यता गट यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. उत्पादने (फूड पॅराडाईज) या प्रवर्गात सामकादेवई स्वयंसाहाय्यता गट, बीड यांना प्रथम, जयलक्ष्मी स्वयंसाहाय्यता गट, नागपूर यांना द्वितीय तर श्री वैष्णवीदेवी स्वयंसाहाय्यता गट, ठाणे यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.नावीन्यपूर्ण उत्पादने : लाइट गेल्यानंतरसुद्धा एलईडी बल्ब चार तास चालू शकतो, असा शोध लावणाºया हरिओम स्वयंसाहाय्यता गटास गौरविण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण व उत्पादने मांडणी या प्रवर्गात संस्कृतिक स्वयंसाहाय्यता गट, सातारा यांना प्रथम क्रमांक, आस्था स्वयंसाहाय्यता गट, अमरावती यांना द्वितीय तर नरेंद्रछाया स्वयंसाहाय्यता गट, लातूर यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
‘महालक्ष्मी सरस’मध्ये १५ कोटींहून अधिक उलाढाल; खरेदीसाठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 4:28 AM