मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत ३ हजार ३४१ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ६५३ जणांना गंभीर व मध्यम स्वरूपाचे आजार होते. यामध्ये गंभीर आजार असलेल्या ४४७ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आतापर्यंत ३२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत ४ हजार ४९५ कोरोना रुग्ण दाखल करण्यात आले. यामध्ये योग्य उपचार पद्धती, रुग्णांना डॉक्टरांकडून वेळोवेळी दिला जाणारा धीर आणि आत्मविश्वास यामुळेच या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारीही असेच गंभीर आजार असूनही कोरोनावर मात केलेल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. श्वसनाचा त्रास असलेल्या ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारासाठी सुरुवातीला या महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु श्वसनाचा त्रास वाढल्याने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करताच आॅक्सिजन देण्यात आल्याने ४८ तासांत महिलेच्या क्ष किरणात सुधारणा झाली. त्यानंतर दोन दिवसांतच महिलेने कोरोनावर मात केली. तर ४० वर्षीय पुरुषाला खोकला व सर्दीचा त्रास असल्याने दाखल केले. परंतु त्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ लागला. या रुग्णालाही आॅक्सिजन देण्यात आला. शिवाय उच्च रक्तदाबही नियंत्रणात आला व प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्यांनाही घरी सोडण्यात आले.कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास धोका जास्त असतो. त्यामुळे या ठिकाणी आॅक्सिजनची सुविधा तैनात ठेवण्यात आली आहे. शिवाय डायलिसिस रुग्णांसाठी असलेल्या सुविधेत २०७ रुग्णांवर १४२३ डायलिसिस करण्यात आले आहे. या दोन्ही सुविधांचा फायदा होत असल्याचे डॉ. स्मिता चव्हाण यांनी सांगितले.
CoronaVirus News : सेव्हन हिल्स रुग्णालयातून ३ हजारांहून अधिक रुग्ण झाले ‘कोविड’मुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 1:25 AM