Join us

मुंबईत कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ३० हजारांंहून अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेरोना संसर्ग रोखण्यासाठी लादलेले निर्बंध पायदळी तुडवणाऱ्यांविरुद्ध गेल्या वर्षीच्या २० मार्चपासून ते आतापर्यंत ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेरोना संसर्ग रोखण्यासाठी लादलेले निर्बंध पायदळी तुडवणाऱ्यांविरुद्ध गेल्या वर्षीच्या २० मार्चपासून ते आतापर्यंत ३० हजारांहून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे.

विनाकारण घराबाहेर भटकणाऱ्यांंवर १८८ अंतर्गत २० मार्च २०२० ते २० मार्च २०२१ पर्यंत २७ हजार ८५१ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले. यात अवैध वाहतूक, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, विनामास्क वावर अशा प्रकारे विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक कारवाई सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी आहे. यात पश्चिम उपनगरात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्धही कारवाई करत त्यांच्याकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला.

* काय आहे कलम १८८

१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार या काळात काही नियम लागू होतात, तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश देऊ शकतात किंवा काढतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

* शिक्षेचे स्वरूप

कलम १८८ या कायद्यातील तरतुदींनुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा हाेऊ शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन किंवा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा हाेऊ शकतात.

- ॲड. प्रकाश साळसिंगिकर, विशेष सरकारी वकील

* नियमांचे उल्लंघन करू नका

नियमांचे उल्लंघन करू नका, याबाबत मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे, तसेच मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, यासाठीही जनजागृती सुरूच आहे.

...................................................................................