तीन वर्षांतील आकडेवारी; हत्ती, वाघ, बिबटे, हरणांसह बछड्यांनी गमावला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत जंगलातील रेल्वे मार्गांवर रेल्वेच्या बसलेल्या धडकेत २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ३२ हजारांहून अधिक वन्यप्राण्यांचा बळी गेला.
रेल्वेचा वेग दिवसा प्रती तास ५० किमी तर रात्री प्रती तास ४० किमी असणे बंधनकारक आहे. मात्र जंगलातून जाणाऱ्या रेल्व्ेमार्गाचा वेग ८० ते १०० किमी असताे आणि हाच वेग प्राणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आराेप प्राणीमित्र अभ्यासकांकडून हाेत आहे. गेल्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेचे जाळे वाढू लागले. कमी खर्चात, जलदगतीने आणि जंगलातून जाणाऱ्या कमी अंतराच्या ट्रेन रूटचे जाळे तयार होऊ लागले. अनेक ट्रेन तर वन्यजीव भ्रमण मार्ग आणि जंगलातून गेले आहेत. जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचा वेग खूपच असल्याने अशा अपघातांमध्ये हत्ती, वाघ, बछडे, बिबटे, अस्वल, गवे, हरिण आणि असंख्य लहान वन्यजीव दरवर्षी मारले जात आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग असाच संवेदनशील असून, येथे नुकतेच वाघाचे बछडे मारले गेले. चंद्रपूरजवळ २०१३ मध्ये २ आणि २०१८ मध्ये ३ वाघांचे बछडे चिरडले गेले. गवे, बिबट, हरिण आणि हजारो लहान वन्य जीव तर दररोज कुठे ना कुठे मारले जात आहेत.
२०१९ मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत गुरेढोरे, सिंह, वाघ आणि लेपर्डसह देशभरात ३२ हजारांहून जास्त प्राणी मारले गेले. २०१९ मध्ये ट्रेनने ३ हजार ४७९ वन्यप्राण्यांना ठार मारले. यामध्ये हत्तींचाही समावेश आहे. २०१६ मध्ये ७ हजार ९४५ वन्यप्राण्यांचा जीव गेला. २०१७ मध्ये ही संख्या ११,६८३ आणि २०१८ मध्ये वाढली आहे, ती १२,६२५ होती.
* वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यासह उपाययोजनांची गरज
वन्यजीव मृत्यूंची गंभीरता पाहता रेल्वेने जंगलातून जाणाऱ्या सर्व मार्गांसाठी दर कि.मी. अंतरात अंडरपास, मार्गाला जाळीचे कुंपण, रात्री ४०, तर दिवसा ५० कि.मी. ताशी गती असावी, रुळावर खाद्यपदार्थ फेकू नये, रुळावर वन्यजीव असल्याच्या अत्याधुनिक सूचना यंत्रणा लावणे बंधनकारक केले जावे आणि वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या वतीने प्रा. सुरेश चोपणे यांनी रेल्वे प्रशासन, राज्य, केंद्रीय वन्यजीव विभाग, व्याघ्र प्राधिकरणाकडे केली आहे.
............................
..................................