तोतया पोलिसावर ३५०हून अधिक गुन्हे
By admin | Published: October 2, 2015 01:23 AM2015-10-02T01:23:49+5:302015-10-02T01:23:49+5:30
गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या सराईत तोतया पोलिसाला टिळक नगर पोलिसांनी अटक केली.
मुंबई : गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या सराईत तोतया पोलिसाला टिळक नगर पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे या अट्टल गुन्हेगारावर मुंबईसह राज्यात ३५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील ४७ गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षादेखील झालेली आहे.
शशिकांत कोळवाडकर (५६) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा गोवा येथील राहणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कुटुंबीयांसह मुंब्रा परिसरात राहतो. पोलिसांप्रमाणेच शरीरयष्टी आणि राहणीमान असल्याने वयाच्या २५ व्या वर्षापासूनच त्याने पोलीस असल्याचे सांगत अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. गेल्या ३० वर्षांत या आरोपीने मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी अनेकांची फसवणूक केली आहे. ४७ गुन्ह्यांमध्ये त्याला न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. १८ वर्षे या आरोपीने विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगली आहे. यात सर्वांत जास्त शिक्षा त्याला ७ वर्षांची झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेंबूरमधील लोखंडे मार्गावरील अंकित ट्रेडर्स या दुकानातील झाकिर खान या कर्मचाऱ्यावर कल्याणमध्ये गुन्हा दाखल असल्याचे सांगत हा आरोपी सोमवारी दुकानात आला. त्याच्यासोबत कलिम खान हा त्याचा साथीदारही होता. दोघांनी स्वत:ची ओळख कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले. या तोतया पोलिसांनी झाकिर खानला ताब्यात घेऊन चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात नेले. तेथे त्यांनी कारवाई न करण्यासाठी झाकिरकडे दोन लाखांची मागणी केली. झाकिरने तत्काळ मालकाला फोन लावून ही माहिती दिली. मालकाने उद्या पैसे देतो, असे सांगत त्यांना मंगळवारी बोलावले. त्यानुसार दोघेही मंगळवारी पैसे घेण्यासाठी लोखंडे मार्गावरील हॉटेलजवळ आले. झाकिर पैसे घेऊन तयार असतानाच टिळक नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी तेथे गस्त घालत होते. पोलिसांना पाहून झाकिरने त्यांना ही बाब सांगितली. दोन्ही आरोपींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून या मुख्य आरोपीला अटक केली, तर कलिम खान हा पसार झाला. (प्रतिनिधी)