मुंबई : गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत मुंबई महालिकेच्या अखत्यारीतील पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत तब्बल ३६,१४१ प्रसूती केल्या. त्यापैकी १९,३२६ नॉर्मल तर १३,९०४ सिझेरियन प्रसूती करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यांत महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३६,१४१ प्रसूती झाल्या. यात सर्वाधिक प्रसूती सायन रुग्णालयात झाल्या आहेत. सायन रुग्णालयात २२४८ सिझेरियन तर २१३३ नॉर्मल प्रसूती झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या भीतीने साधा ताप आला तरी महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. अशा वेळी मुंबई महापालिकेने आपल्या नायर रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला. पालिकेच्या केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालयासह सर्वसाधारण रुग्णालये व प्रसूतीगृहांमध्ये गर्भवती महिलांच्या प्रसूती करण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या संकटसमयी कोरोनाबाधित व कोरोना निगेटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती सुरळीत पार पाडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
चौकट
सायन रुग्णालय - सिझेरियन प्रसूती – २२४८ , नॉर्मल प्रसूती - २१३३
केईएम रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - १४३० , नॉर्मल प्रसूती - १७१५
वाडिया रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - ११२५ नॉर्मल प्रसूती – ९२३
कूपर रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - १२७६ नॉर्मल प्रसूती - १४६८
राजावाडी रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - १०६५ नॉर्मल प्रसूती - १४६२
वांद्रे भाभा रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - ७२४, नॉर्मल प्रसूती – ९१८
कामा रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - ८३७, नॉर्मल प्रसूती - ९११