देशातील ७० लाख महिलांना करिअरमध्ये नव्याने घ्यायचीय झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:31 AM2019-12-08T03:31:16+5:302019-12-08T03:31:38+5:30
सेकंड करिअर मूव्हमेंटच्या पंखांचे बळ, कौटुंबिक कारणांमुळे नोकरी सोडत असल्याचे उघडकीस
- सचिन लुंगसे
मुंबई : विविध कारणांमुळे महिलांना अर्ध्यावरच करिअरवर पाणी सोडावे लागते. मात्र अशा महिलांना आता ‘सेकंड करिअर मुव्हमेंट’च्या पंखांचे बळ लाभले आहे. या पंखांच्या बळावर कमबॅक करत करिअरच्या आकाशात भरारी घेण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विशेषत: कॉर्पोरेट क्षेत्रात कमबॅक करण्यास इच्छुक असलेल्या महिलांचे प्रमाण अधिक असून, त्यादृष्टीने प्रयत्न करीत असलेल्या किंवा सेकंड करिअरची इच्छा असलेल्या अशा महिलांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमाण ७० लाख आहे.
कॉर्पोरेट भारतातील परिसंस्थेचा आढावा घेणाऱ्या ‘सेकंड करिअर्स आॅफ विमेन प्रोफेशनल्स-द इंडिया स्टोरी’ या अहवालातून ही बाब समोर आली असून, ‘व्ह्यूपोर्ट २०१९’ या वार्षिक संशोधनातून ही बाब मांडण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रांत काम करीत असलेल्या आणि अर्धवट सोडलेल्या करिअरची नव्याने सुरुवात केलेल्या ७८३ महिलांशी संवाद साधत यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले. सरासरी ९.५ वर्षांचा कामाचा अनुभव आणि सरासरी ४.४ वर्षांचे कमबॅक करिअर असलेल्या महिलांचा यात समावेश करण्यात आला आहे. या महिलांना कॉर्पोरेट कंपन्यांकडून मागणी होत आहे.
सेकंड करिअर महिलांच्या यशामधील अडचणी
घरातून सहकार्य न मिळणे (२३ टक्के)
नेटवर्कचा अभाव(५९ टक्के)
कौशल्याचा तुटवडा(३६ टक्के)
अहवाल काय सांगतो?
४५% महिला या मातृत्वाचे आव्हान स्वीकारण्यासाठी करिअरमध्ये
ब्रेक घेतात.
३५% महिला या प्रसूती किंवा बाळंतपणासाठी करिअरला तात्पुरता अर्धविराम देतात.
१६% महिला या घरातील वृद्ध व्यक्तींसाठी करिअरमध्ये ब्रेक घेतात.नव्या सुरुवातीसाठी असे करतात प्रयत्न
६९ टक्के महिलांनी चांगल्या कामासाठी तंत्रज्ञानाद्वारे कौशल्ये वाढवली.
६६ टक्के महिलांनी कमबॅकबाबत समुपदेशक वा मार्गदर्शकांची मदत घेतली. ८६ टक्के सेकंड करिअर महिलांनी करिअर संकेतस्थळांवर नव्या नोकऱ्यांसाठी अर्ज केले. ३० टक्के महिला करिअर कमबॅकसाठी रिक्रूटमेण्ट कन्सल्टन्सींवर अवलंबून आहेत. २९ टक्के महिला नोकºयांसंबंधीच्या जाहिरातींवर अवलंबून राहतात.
सेकंड करिअरबाबत नेमके काय वाटते?
अहवालानुसार, आर्थिक स्थैर्य किंवा स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा सुयोग्य वापर करण्याची इच्छा या दोन्ही प्रेरणांतून अनुक्रमे प्रत्येकी ३८ टक्के महिला करिअरला पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. ६३ टक्के महिलांना फूल-टाइम जॉब स्वीकारून नव्याने सुरुवात करण्याची इच्छा आहे.
नव्याने करिअर सुरू करताना कामात लवचीकपणा असावा, असे २३ टक्के महिलांना वाटते. ४५ टक्के महिलांना मूळ क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र निवडायचे आहे. तर, ४१ टक्के महिलांनी त्यांच्याच मूळ क्षेत्रात काम करायला आवडेल, असे सांगितले.