राज्यातील ४५० हुन अधिक इंटर्न डॉक्टर्स कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:53+5:302021-04-13T04:06:53+5:30
मुंबई – राज्यातील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा कामाचा अतिताण सहन करावा लागत आहेत तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. ...
मुंबई – राज्यातील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा कामाचा अतिताण सहन करावा लागत आहेत तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. मागील दोन महिन्यांत राज्यातील ४६३ हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर आता शासकीय महाविद्यालयांतील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरही कोरोना बाधित झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णसेवेत नाहीत. मात्र, तरीही सातत्याने आरोग्य यंत्रणेत या डॉक्टरांचा वावर असल्याने यांच्यात संसर्गाची बाधा वाढताना दिसत आहे. परिणामी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या कठीण काळात परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संघटना असणाऱ्या असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नचे अध्यक्ष डॉ. वेदकुमार घंटाजी यांनी केली आहे.
मागील वर्षभरापासून निवासी डॉक्टरांसह प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे शैक्षणिक वर्षही कोरोना सेवेत निघून गेले आहे. परिणामी, यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मांडली आहे. किमान एखाद्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला संसर्ग झाल्यास रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे, मात्र असे होत नसल्याने अवितरपणे कोविड-नाॅन कोविड सेवेत काम करूनही आरोग्य यंत्रणाही आमचा विचार करत नसल्याची खेदजनक बाब डॉ. वेदकुमार यांनी अधोरेखित केली आहे.