लॉकडाऊन काळात लालपरीमार्फत ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 04:16 PM2020-06-09T16:16:02+5:302020-06-09T16:16:48+5:30
परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी, त्यांच्या राज्यात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस राज्याच्या सीमेपर्यंत धावल्या.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रेल्वेद्वारे मजुरांना, अडकलेल्या नागरिकांना मूळगावी सोडले जात आहे. अशाच प्रकारची कामगिरी लॉकडाऊन काळात लालपरीने केली आहे. परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी, त्यांच्या राज्यात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस राज्याच्या सीमेपर्यंत धावल्या. यातून ३१ मेपर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक स्थलांतरित नागरिकांना रेल्वे स्थानक, नागरिकांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले.
मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली. परराज्यातील नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्यात जाता यावे, यासाठी महामंडळाने बस उपलब्ध करून दिल्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहचविले. यासाठी राज्य सरकारने १०४ कोटी ८९ लाख रुपयांचा खर्च केला.
-----------------------
२ लाखांहून अधिक नागरिकांना रेल्वे स्थानकावर पोहोचवले
उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याचे काम एस.टी महामंडळाच्या बसद्वारे केले. यातून २ लाख २८ हजार १०० नागरिकांनी यातून प्रवास केला.
---------------
३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले
गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एस.टीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले. यातून ३ लाख ०९ हजार ४९३ नागरिकांनी यातून प्रवास केला.
--------------
या प्रदेशातून उपलब्ध झाल्या बस
औरंगाबाद प्रदेशातून औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीहून बस उपलब्ध करून देण्यात आल्या. मुंबई प्रदेशातून मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, नागपूर प्रदेशातून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, पुणे प्रदेशातून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक प्रदेशातून अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ मधून बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.
------------
३१ मे पर्यंतच्या अभियानात एसटी महामंडळाच्या एकूण ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत नागरिकांना रेल्वे स्थानक, नागरिकांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले. या काळात बसने तब्बल १५२ लाख ४२ हजार किमीचा प्रवास केला.