सीमा शुल्क चुकवून आयात केल्या ५० हून अधिक महागड्या गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:02+5:302021-07-20T04:06:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे महागड्या गाड्या आयात करून सीमा शुल्क चुकवणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तचर यंत्रणेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे महागड्या गाड्या आयात करून सीमा शुल्क चुकवणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) नुकताच पर्दाफाश केला. या टोळीने गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे ५० हून गाड्या परदेशातून भारतातील विविध बंदरात उतरविल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
परदेशी वकालतीत काम करणारे राजदूत, राजनैतिक अधिकारी यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून या टोळीने आतापर्यंत सीमा शुल्क विभागाची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. दुबई स्थित अब्दुल रेहमान हा टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय डीआरआय आहे. हवालामार्गे त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवले जायचे या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२००८ साली अशाप्रकारे करचुकवेगिरी करून वाहने आयात करण्यात आली होती. त्यावेळी विविध देशांतून आयात केलेल्या ३६ गाड्या डीआरआयने जप्त केल्या होत्या. या प्रकरणामागेही अब्दुल रेहमान याचाच हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आतापर्यंत या प्रकरणात अंधेरीच्या शोरूममधून सहा महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत काही कोटींमध्ये आहे. तसेच आणखी २० गाड्यांचा ठावठिकाणा समजला असून, गैरमार्गाने एकूण ५० गाड्या आयात केल्याची माहिती तपासातून समोर आले आहे.
प्रकरण काय?
- परदेशी वकालतीत काम करणारे राजदूत, राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशातून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची आयात केल्यास सीमा शुल्कात सूट दिली जाते. इतरांना मात्र निर्धारित शुल्क भरावे लागते.
- परदेशातून महागड्या गाड्यांची आयात करावयाची असल्यास एकूण किमतीच्या तब्बल २०४ टक्के आयात कर द्यावा लागतो. शिवाय त्यावर २८ टक्के जीएसटी आणि १२.५० टक्के सरचार्ज आकारला जातो.
- हा कर चुकविल्यास मोठा फायदा लाटण्याची संधी हेरून या टोळीने अनोखी शक्कल लढविली. त्यानुसार, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे गाड्या मागवून करचुकवेगिरीचा सपाटा लावला. डीआरआयने सापळा रचून गेल्या आठवड्यात या टोळीचा पर्दाफाश केला.