राज्यात ५० लाखांहून अधिक कोरोनाबाधित, तर बळींचा आकडा ७५ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:56+5:302021-05-10T04:06:56+5:30

बळींचा आकडा ७५ हजारांवर : रशिया, इटली, युकेपेक्षा महराष्ट्रात रुग्ण अधिक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्यावर्षी मार्च महिन्यात ...

More than 50 lakh corona affected in the state, while the number of victims is over 75 thousand | राज्यात ५० लाखांहून अधिक कोरोनाबाधित, तर बळींचा आकडा ७५ हजारांवर

राज्यात ५० लाखांहून अधिक कोरोनाबाधित, तर बळींचा आकडा ७५ हजारांवर

Next

बळींचा आकडा ७५ हजारांवर : रशिया, इटली, युकेपेक्षा महराष्ट्रात रुग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला राज्यात सुरुवात झाली, त्यानंतर आता एक वर्षानंतर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० लाखांच्या वर गेली आहे, तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात ७५ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. जागतिक स्तरावर विचार करता रशिया ४८ लाख, इटली ४१ लाख आणि युके ४४ लाख यांसारख्या देशांच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील १७ दिवसांत राज्यात एक लाख रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असून, ३५ पैकी २२ जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे, या जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २० टक्क्यांच्या घरात आहे.

राज्यात नंदुरबार जिल्ह्यात २.९३ टक्के एवढे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. याशिवाय हिंगोली २.४६ टक्के, सिंधुदुर्ग २.३३ टक्के, नांदेड २.२९ आणि औरंगाबाद १.१९ अशाप्रकारे मृत्यूच्या प्रमाणाची नाेंद आहे. मृत्युदराप्रमाणेच राज्यातील ग्रामीण भागात रुग्णवाढीचे प्रमाणही अधिक आहे. बऱ्याच जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.१८ टक्के आहे, तर त्यानंतर बुलढाणा २.८३, परभणी २.६७, बीड २.६४, सिंधुदुर्ग २.६० टक्के, तर मुंबईत ते ०.५१ टक्के एवढे आहे.

* ग्रामीण भागात नियम अधिक कठाेर करण्याची गरज

राज्यातील शहरी भागांत लाॅकडाऊनचे नियम कठोरपणे पाळण्यात आले, मात्र ग्रामीण भागांत हे नियम पाळण्यात आले नाही. त्यामुळे या भागांत कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती गंभीर आहे. आता प्रशासनाने या ठिकाणी अधिक कठोरपणे नियम लावून अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागांतील आरोग्य सेवा-सुविधांकडेही लक्ष दिले पाहिजे.

- डॉ. शशांक जोशी, राज्य कोरोना टास्क फोर्स

* साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही चिंताजनक

राज्यात पालघर जिल्ह्यात साप्ताहिक पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण ४०.८५ टक्के आहे. त्याखालोखाल बुलढाणा येते ३९.२५टक्के, अहमदनगर ३९.०२, हिंगोली ३४.८७, सातारा ३४.३७ आणि परभणीत ३२.७७ टक्के इतके आहे. पुण्यात २९.१५ टक्के, नाशिक २९.२० टक्के आणि ठाण्यात २६.४५ टक्के साप्ताहिक पॉझिटिव्हिटी प्रमाणाची नाेंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १५ जिल्ह्यांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे आता २२ जिल्ह्यांची स्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे.

Web Title: More than 50 lakh corona affected in the state, while the number of victims is over 75 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.