Join us

राज्यात ५००हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM

मुंबईतील २०० जणांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना नियंत्रणाच्या लढाईत निवासी डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. कोरोनाचा फटका ...

मुंबईतील २०० जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना नियंत्रणाच्या लढाईत निवासी डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. कोरोनाचा फटका या डाॅक्टरांनाही बसला. आतापर्यंत पाचशेहून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे; त्यात मुंबईतील २०० डॉक्टरांचा समावेश आहे.

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होऊन रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोरोना ड्युटी संपवून ते वसतिगृहात एकत्र राहत हाेते, हे या संसर्गामागचे एक प्रमुख कारण आहे.

उन्हाळ्यामुळे तापमान प्रचंड वाढले आहे. त्यातच पीपीई किट घालून या डॉक्टरांना रुग्णसेवा करावी लागते. एका निवासी डॉक्टरला सुमारे ३० खाटांच्या वॉर्डची जबाबदारी दिली जाते, त्यात १०-१२ तासांची ड्युटी असते. याचा त्यांना त्रास हाेत असल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेची चार प्रमुख रुग्णालये आणि जे. जे. रुग्णालयात मिळून जवळपास अडीच हजार निवासी डॉक्टर आहेत. आतापर्यंत केईएम रुग्णालयातील २८, नायरमधील २४, सायनमधील २१, कूपरमधील १० आणि जे. जे. रुग्णालयातील ७४ निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशाप्रकारे मुंबईतील एकूण २०० डाॅक्टरांना काेराेनाची बाधा झाली आहे.

* दोन महिन्यात ५१२ बाधित

राज्यात ४ हजार ५०० निवासी डॉक्टर आहेत. त्यातच ७० टक्के काेविड रुग्णसेवा ही निवासी डॉक्टर करतात. गेल्यावर्षी ९००हून अधिक जणांना कोरोना झाला होता, तर दुसऱ्या लाटेत दोन महिन्यात ५१२ जणांना संसर्ग झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेत निवासी डॉक्टरांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे आमच्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्याकडेही राज्य शासनाने आणि पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका आहे.

- डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील,

अध्यक्ष, मार्ड

-----------------------------------