एमटीएनएलला ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी दिली सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:57+5:302021-06-06T04:05:57+5:30

मुंबई : कधीकाळी मुंबई आणि दिल्ली या महानगरांवर हुकूमत गाजवणाऱ्या एमटीएनएलच्या ग्राहकसंख्येचा आलेख दिवसागणिक खालावत आहे. डिसेंबर, जानेवारी आणि ...

More than 50,000 customers gave leave to MTNL | एमटीएनएलला ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी दिली सोडचिठ्ठी

एमटीएनएलला ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी दिली सोडचिठ्ठी

Next

मुंबई : कधीकाळी मुंबई आणि दिल्ली या महानगरांवर हुकूमत गाजवणाऱ्या एमटीएनएलच्या ग्राहकसंख्येचा आलेख दिवसागणिक खालावत आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी एमटीएनएलला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे.

देशात मोबाइलच्या आगमनानंतर एमटीएनएलने महानगरांत आपले जाळे विस्तारत असंख्य ग्राहक जोडले. त्याकाळी लांबलचक रांगा लावून एमटीएनएलचे सीमकार्ड खरेदी केल्याचे किस्से आजही नाक्यानाक्यांवर सांगितले जातात. खासगी कंपन्यांनी दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर प्रचंड स्पर्धा निर्माण झाली; पण पायाभूत सुविधांचे सर्वाधिक स्रोत, सरकारी पाठबळ आणि कुशल मनुष्यबळ पदरी असतानाही एमटीएनएलला या स्पर्धेत टिकाव धरता आला नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांचा ग्राहकसंख्येचा आलेख घसरणीला लागला आहे.

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यांत ५० हजार ९२० ग्राहकांनी एमटीएनएलची सेवा बंद केली. त्यात वायरलेस १३ हजार ५७३, तर वायरलाइन प्रकारातील ३७ हजार ३४७ ग्राहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकारांत मुंबईतील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जूनपर्यंत एमटीएनएलची ग्राहकसंख्या २.७३ टक्के, जुलै ते सप्टेंबर २.५३, तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत १.४२ टक्क्यांनी कमी झाली.

एकीकडे ५ जी तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी उत्सुकता दर्शविली असताना सातत्याने कमी होणारी ग्राहकसंख्या एमटीएनएलसाठी चिंतेचा विषय आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे; परंतु ग्राहक सेवा, तक्रारींचा निपटारा लावण्याची पद्धत आणि नेटवर्क क्षमता यात बदल केल्याशिवाय खासगी कंपन्यांशी स्पर्धा करून नफा कमावण्याचे एमटीएनएलचे उद्दिष्ट फोल ठरेल, असे मत दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. दरम्यान, यासंदर्भात एमटीएनएलच्या मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

* वायरलाइन ग्राहक

शहर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीत घट

दिल्ली १३३७०८८ - १३३०३०८ - १३२३९६७ - १३१२१

मुंबई १६२३००३ -१६११२४० -१५९८७७७ -२४२२६

एकूण - २९६००९१ -२९४१५४६ -२९२२७४४ -३७३४७

* वायरलेस ग्राहक

शहर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी घट

दिल्ली २१६९४४९ -२१६६५८२ -२१६५३३४ -४११५

मुंबई ११४८१८४ -११४२७३९ -११३८७२६ -९४५८

एकूण ३३१७६३३ -३३०९३२१ -३३०४०६० -१३५७३

* बाजारव्याप्ती (वायरलाइन)

बीएसएनएल - ३३.७५ टक्के

एअरटेल - २३.३०

जिओ - १५.६०

एमटीएनएल - १४.४८

............

* बाजारव्याप्ती (वायरलेस)

जिओ - ३५.५४ टक्के

एअरटेल - २९.८३

व्होडाफोन-आयडिया - २४.२०

बीएसएनएल - १०.१४

एमटीएनएल – ०.२८

..............................................................

Web Title: More than 50,000 customers gave leave to MTNL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.