Join us

अभियांत्रिकीच्या ६० हजारांहून अधिक जागा अद्याप रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 7:49 AM

अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे तीन फेऱ्यांनंतर राज्यात एकूण जागांपैकी ४८ टक्के जागा म्हणजे ६० हजारांहून अधिक जागा रिक्त. अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यात १,२७,५३७ जागा उपलब्ध आहेत.

मुंबई - अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रिक्त राहण्याची भीती असून तीन फेऱ्यांनंतर राज्यात एकूण जागांपैकी ४८ टक्के जागा म्हणजे ६० हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.

राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून सीईटी सेलच्या तंत्रशिक्षण विभागामार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील पूरपरिस्थिती तसेच बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागण्यास याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाल्यास पूरग्रस्त भागातील प्रवेश घेऊ न शकलेले विद्यार्थी आणि बारावी फेरपरीक्षेत पास झालेले विद्यार्थीही प्रवेश निश्चित करू शकतील, असे सीईटी सेलच्या तंत्रशिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक सुभाष महाजन यांनी सांगितले.

बारावीच्या निकालात राज्यातील नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तसेच कुशल मनुष्यबळासाठी अनेक शासनाच्या योजना सुरू करूनही या वर्षीदेखील अभियांत्रिकी प्रवेशाला अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे या वर्षीही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यात १,२७,५३७ जागा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप १, कॅप २ आणि कॅप ३ मिळून शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत ५४,५२४ विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. इन्स्टिट्यूट लेव्हलला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ही ५,६७५ आहे. जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी कोटा आणि इतर प्रवेश असे सर्व प्रवेश मिळून आतापर्यंत ६९ हजार २६८ प्रवेशाची निश्चिती प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकला अत्यल्प प्रतिसाद

कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. त्याखालोखाल कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल्सला विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पसंती दर्शविली आहे. मात्र, बांधकाम क्षेत्रासाठीचे सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

 

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालय