Join us

६० हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 5:53 AM

मुंबई, ठाणे जिल्ह्यासह एकूण १७ मतदारसंघ

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी होणारे मतदान सुरळीतपणे पार पडावे, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यासह एकूण १७ मतदारसंघांसाठी तब्बल ६० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.पोलिसांसह राज्य व केंद्रीय राखीव दलाचे जवान, होमगार्ड यांना रविवारीच संबंधित मतदारसंघातील नियोजित मतदान केंद्रांच्या ठिकाणी नेमले जाणार आहेत, या दिवसापासून पोलिसांच्या तीन दिवस रजा व साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.गडचिरोली येथे मतदानादिवशी झालेली किरकोळ हिंसक घटना वगळता, राज्यातील पहिल्या तीन टप्प्यांत सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान पार पडले. दरम्यान, चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघांमध्ये होणाºया मतदानामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्याकडून सर्व घटकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, स्थानिक पोलिसांसह मतदानाच्या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवळपास ११० कंपन्या सज्ज झाल्या आहेत. त्यामध्ये ११ हजारांहून अधिक जवानांचा समावेश असून, मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर, राज्य राखीव दल आणि होमगार्ड यांनाही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे.मुंबईत नाकाबंदी; वाहनांचीही तपासणीमुंबईतील ६ मतदारसंघात मतदानादिवशी कोणतीही अनुचित घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले. शुक्रवारपासून नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांचीही कसून तपासणी सुरू आहे. समाजकंटक , गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मतदानपोलिस