लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली तामिळनाडूसह अन्य काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यातही शाळा सुरू करण्याची मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी पालकांकडून होत असताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडूनही ५ सप्टेंबरपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तारीख उलटून गेली तरी याबाबतीत कार्यवाही होताना दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अद्याप शिक्षकांची आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण संचालनालयाकडून तर अद्याप याबाबतीतील कोणतेही निर्देश निर्गमित करण्यात न आल्याने आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
मुंबई जिल्ह्याचा विचार केला असता पालिका शिक्षण विभागाकडून पालिका शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती गोळा करण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण १० हजार ८१० पालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६ हजार ९४८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केवळ ३ हजार ८२६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्रलंबित असून, त्यातही यांचे दुसरे डोस बाकी असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण महत्त्वाचे असून, पालिका शिक्षण विभाग यावर तातडीने कार्यवाही करीत असून, लवकरच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी लसवंत होतील याची खबरदारी आम्ही घेऊ, अशी प्रतिक्रिया तडवी यांनी दिली. शहरातील खाजगी शाळांतील शिक्षकांची माहिती उपसंचालक कार्यालयांकडून मिळू शकलेली नाही.
लोकल सर्कल या संस्थेने ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार शाळा किंवा शैक्षणिक संस्थेत शाळा सुरू करण्याआधी लसीकरणाची मोहीम राबवून शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करावे असे मत ८९ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. यामुळे संबंधित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना प्राधान्याने लस मिळू शकेल आणि शाळा सुरू करण्याआधी घेतल्या जाणाऱ्या खबरदारीतील मोठा टप्पा पार पाडला जाईल, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
तसेच शिक्षण विभागाने राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडे शाळा सुरू करण्याबाबत कोणती खबरदारी घेता येईल, याची विचारणा केली होती. यामध्ये शिक्षक लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असले तरी राज्यातील शिक्षकांचे लसीकरण अजून पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शिक्षकांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी शिक्षक संघटना व मुख्याध्यापकांकडून सुरुवातीपासून होत आहे.
कोट
मुंबईतील ७० टक्के शिक्षक, शिक्षकेतर लगतच्या ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात, तसेच उपरोक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामीण भागात राहतात. त्यानुसार शिक्षकांना त्यांच्या निवासस्थानाजवळील विधानसभा क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर प्राधान्य द्यावे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे.
शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद, मुंबई
.............................
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक लसीकरण अत्यावश्यक आहे, यात वाद नाही. ऑनलाइन शिकवण्या सुरू असल्याने शिक्षकांसाठी शक्यतो वेळेची लवचिकता असणारे स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास त्यांची आणि शाळांच्या वेळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई