१ लाखाहून अधिक विद्यार्थी लावत आहेत हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील ९वी ते १२वीच्या ७० टक्के शाळा सुरू झाल्या असून सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये तब्बल १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. आतापर्यंत राज्यात ९वी ते १२वीचे वर्ग असलेल्या १६ हजार ४२० शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. गडचिरोली, उस्मानाबाद, सोलापूर, वाशीम लातूर, भंडारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यातही ९० टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. जळगाव, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत विद्यार्थी उपस्थिती ही ५० टक्क्यांहून अधिक आहे. इतर ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती अजूनही तुरळक असल्याचे दिसून येत आहे. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात आतापर्यंत शाळा सुरू होण्याचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे.
* शैक्षणिक वर्षाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह कायम
शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन कसे करणार? काय? योजना आणि आराखडा असणार? यासंबंधी शाळांना कधी सूचना देणार, या प्रश्नांची उत्तरे अद्याप दिलेली नाहीत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात आजपासून होत असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन या संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळा संस्थाचालकांसह, प्रशासन, शिक्षक, पालक हे सारेच विभागाकडून स्पष्ट सूचना व निर्देशांची वाट पाहत आहेत.
....................